प्रकाश साबळे
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात सदनिका मिळालेल्या पात्र झोपडीधारकांच्या सदनिकेत अवैधरित्या वास्तव्य करणार्या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यामध्ये मुंबई शहर उपजिल्हाधिकारी विशेष कक्ष आघाडीवर आहे. या कक्षाने दोन वर्षांत सुमारे 216 घुसखोरांना बाहेर काढले, तर पश्चिम उपनगरे विशेष कक्ष विभागाने 43 आणि पूर्व उपनगरे विशेष कक्ष विभागाने फक्त 2 नागरिकांना बाहेर काढल्याचे समोर आले. (Latest Mumbai News)
मुंबई महानगर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू करत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची निर्मिती केली. या प्राधिकरणांतर्गत झोपडीधारकांची पात्र, अपात्रता निश्चित करणे, झोपडी निष्कासित करणे, एलओआय, आयओए देणे, विकासकांना इमारत उभारणीसाठी पीसीसी देणे तसेच सदनिका वितरित करणे आणि पात्र झोपडीधारकांच्या सदनिकेत अवैधरित्या वास्तव्य करणार्या नागरिकांवर कारवाई करणे आदी कामे केली जातात.
दोन वर्षांत विशेष कक्ष मुंबई शहर विभागात एकूण 30 प्रकरणांत 251 पात्र सदनिकेत अवैधरित्या नागरिक राहात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर (विशेष कक्ष) मुंबई शहर यांनी धडक कारवाई करून 216 घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखविला, तर 35 घुसखोरांवर कारवाई सुरू असून त्यांची आणि पात्र झोपडीधारकांची सुनावणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर यांनाही घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआरए प्राधिकरणाला ठरवून दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात अनेक विषय मार्गी लागले आहेत. यापैकी घुसखोरांना बाहेर काढण्याविषयीच्या प्रकरणात उपजिल्हाधिकारी विशेष कक्षाला मोठे यश आले आहे. त्यामुळे दोन वर्षांत खर्या लाभार्थी झोपडीधारकांना आपल्या हक्काच्या घरात जाण्यास न्याय मिळाला आहे.
पात्र सदनिकाधारकांच्या घरात अवैधरित्या वास्तव्य करणार्या घुसखोरांना बाहेर काढण्यास पूर्व उपनगरे विशेष कक्ष पिछाडीवर पडलेला दिसून येतो. या विभागात मागील दोन वर्षांत 28 प्रकरणे दाखल झाली होती. यात 185 सदनिकांत घुसखोरी अर्थात अवैधरित्या नागरिक वास्तव्याला आहेत, परंतु 2 जणांना बाहेर काढण्यात आले, तर 183 घुसखोर अद्यापही पात्र सदनिकाधारकांच्या घरात वास्तव्याला आहेत, तर पश्चिम उपनगरे विशेष कक्षात 28 प्रकरणे दाखल झाली असून यात 53 घुसखोरांनी कब्जा केला असून 43 जणांना बाहेर काढण्यास यश आले आहे, तर 10 जणांवार कारवाई प्रलंबित आहे.