मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तीन मूर्ती पोदनपूर येथे नव्या कबुतरखान्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याहस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या जागेवर हा कबुतरखाना उभारण्यात आला आहे. या कबुतरखान्याचा कोणालाही त्रास होणार नसल्याचे सांगतानाच स्थानिक रहिवाशांचे हित जपून प्रत्येक वॉर्डात अशा प्रकारचा कबुतरखाना उभारण्याचा मानस मंत्री लोढा यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. (Latest Mumbai News)
कबुतरखाना हटविण्याच्या न्यायालयीन निर्देशानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने दादरमधील कबुतरखान्यावर कारवाई केली. त्याला जैन समाजाकडून विरोध झाल्याने कारवाईवरून राजकीय वादंगाला सुरूवात झाली. पुढे यासंदर्भातील निर्णयासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना झाली. मुंबईतील नॅशनल पार्कसारख्या ठिकाणी कबुतरखाना हलविण्यात यावा, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यावेळी केली होती. अखेर रविवारी जैन समाजाच्या मदतीने याठिकाणी नव्या कबुतरखान्याची निर्मिती करण्यात आली.
या कबुतरखान्याच्या उद्घाटनंतर मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, काही दिवसांपूर्वी जैन समाजाकडून याठिकाणी कबुतरखाना उभारण्यासाठी पाहणी केली होती. त्यानंतर एक महिन्याच्या आत याठिकाणी कबुतरखाना उभारण्यात आला आहे. आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या जागेवर नवा कबुतरखाना उभारण्यात येणार असून ही जागा नॅशनल पार्कच्या अखत्यारित येते. त्यामुळे या कबुतरखान्याचा कुणालाही त्रास होणार नाही.
लवकरच प्रत्येक वॉर्डात अशा ठिकाणी कबुतरखाना उभा करण्याचा आमचा मानस आहे, ज्यामुळे कबुतरांचे रक्षण होईल आणि नागरिकांनाही त्याचा त्रास सहन होणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आदिनाथ दिगंबर जैन मंदिरातर्फे हा कबुतरखाना उभारण्यात आला असून महिनाभरापूर्वी मानवविरहित वस्त्यांमध्ये कबुतरांना दाणा-पाणी सुरू रहावे, असा विचार मंत्री लोढा यांनी मांडला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा कबुतरखाना तयार करण्यात आल्याचे ते म्हणाले.