

Army Soldiers Murali Naik Martyr in Uri
मुंबई : भारताने ऑपरेशन शिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईकने पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर बिथरलेल्या पाकने सीमेवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला आहे. याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत पाकला सळो की पळो करून सोडले आहे. दरम्यान भारत - पाक युद्ध भडकले असताना या युद्धात घाटकोपरच्या पंतनगर परिसरात राहणारे भारतीय जवान मुरली श्रीराम नाईक (वय २३) हे शुक्रवारी पहाटे ३:३० उरी जम्मू काश्मीर येथे शहीद झाले. त्यांचा पार्थिवावर शनिवारी मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
घाटकोपरच्या कामराज नगर चित्रा डेअरी जवळ श्रीराम नाईक कुटुंबासोबत राहत असून त्यांचा मुलगा मुरली नाईक (२३) हे २०२२ मध्ये भारतीय सेनेत भरती झाले. त्यांची ट्रेनिंग नाशिकच्या देवळाली येथे झाली होती त्यानंतर पहिल्यांदा त्यांची आसाम येथे पोस्टिंगला झाली. त्यानंतर ते पंजाब येथे तैनातीस असताना त्यांना युद्धा दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्य देण्यात आले होते. उरी, जम्मू काश्मीर येथे कर्तव्य करीत असताना भारत - पाक दरम्यान सुरू असलेल्या युद्धात त्यांना शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता वीरमरण आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र शोककळा पसरली.
त्यांचे वडील श्रीराम नाईक व त्यांची आई ज्योती नाईक सध्या ते त्यांच्या मूळ गावी राज्य आंध्र प्रदेशमधील कल्की तांडा, गोरंटाला मंडळा, जिल्हा सत्यसाई नगर या ठिकाणी यात्रा असल्याने गेले आहेत. पंजाब थलसेना कार्यालयातून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला असून. शनिवारी (दि.१०) त्यांच्या मुळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.