मुंबई : राज्यातील शिक्षणाचा दर्जा खालावल्याबद्दल शरद पवार यांना चिंता; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

शरद पवार
शरद पवार
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला असल्याचे जाहीर झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

यापूर्वी दुसऱ्या स्थानावर असलेल्या राज्याला पुन्हा या स्थानी आणण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पत्राद्वारे केली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांना शरद पवार यांनी पाठवलेले हे पहिलेच पत्र आहे.

सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेय व्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र, आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्सच्या (पीजीआय) अहवालानुसार राज्याची दुसर्‍या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. राज्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ज्या निकषांच्या आधारे हे मूल्यमापन केले जाते त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, पायाभूत सुविधा, बदलती शैक्षणिक प्रक्रिया आदी मुद्द्यांचा समावेश होतो. परंतु पीजीआयच्या अहवालानुसार महाराष्ट्रात या महत्वपूर्ण घटकांना गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसून येत नाही. यामुळे राज्य म्हणून शैक्षणिक गुणवत्तेत खूपच मागे पडले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने मागील वर्षी 'दोन शिक्षकी शाळांचे सक्षमीकरण' या विषयावर एक दिवसाची परिषद घेऊन काही निरीक्षणे नोंदविली होती. यासोबतच बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या दृष्टीकोनातून काही सूचना देखील केल्या होत्या. राज्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ३८ हजार दोन शिक्षकी शाळा आहेत. त्या प्रामुख्याने वाड्या-वस्त्यांवर असून विद्यार्थी पट संख्या कमी असल्याने त्या बंद करण्याची चर्चा अधून-मधून होत असते. त्यामुळे शासनाने त्याची गंभीर दाखल घेणे अतिशय गरजेचे आहे.

खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करायला हव्यात. या सर्व बाबींचा विचार करता राज्य शासन आणि विशेषतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. याबाबत सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक बोलावून आवश्यक कृती कार्यक्रम तयार करावा. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शरद पवार यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news