Cyber Crime Mumbai | शायना एन.सी. यांच्या पाठपुराव्याला यश; सायबर भामट्यांकडून फसवलेले ३.१५ लाख मिळविले परत

फोन हॅक करून नऊ जणांची ४.९ लाखांची फसवणूक; तीन महिन्यांच्या तपासानंतर गामदेवी पोलिसांची कारवाई; भंडारा ते बिहारपर्यंत आरोपींचा माग काढला
Fraud Money Returned
Fraud MoneyPudhari
Published on: 
Updated on: 

Shaina NC Fraud Money Returned

मुंबई : शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. यांचा मोबाइल फोन हॅक करून त्यांच्या परिचितांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांविरोधात मुंबई पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. शायना एन.सी. यांच्या तीन महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गामदेवी पोलिसांना फसवणुकीतील ३.१५ लाख रुपये हस्तगत करण्यात यश आले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग भंडारा जिल्ह्यापासून बिहारपर्यंत काढला.

१६ जुलै २०२६ रोजी सायबर गुन्हेगारांनी शायना एन.सी. यांचा मोबाइल फोन हॅक केला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्क यादीतील परिचितांना त्यांच्या नावाने संदेश पाठवून पैशांची मागणी करण्यात आली. 'तातडीने मदत हवी असून ४९ हजार रुपये पाठवा, दोन तासांत परत करतो,' असा संदेश पाठवून अनेकांची फसवणूक करण्यात आली. शायना यांच्या नावावर विश्वास ठेवून अवघ्या तीन तासांत नऊ जणांनी सुमारे ४.९ लाख रुपये सायबर भामट्यांच्या खात्यांमध्ये जमा केले.

Fraud Money Returned
Navi Mumbai Airport New Flights : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ९ नवीन देशांतर्गत हवाई मार्ग सुरू

तक्रारीनंतरही पाठपुरावा सुरूच

मोबाइल हॅक झाल्याचे लक्षात येताच शायना एन.सी. यांनी विलंब न करता गामदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, तोपर्यंत फसवणुकीची रक्कम विविध खात्यांमधून काढण्यात आली होती. तरीही त्यांनी केवळ तक्रार दाखल करून थांबण्याऐवजी पीडितांचे पैसे परत मिळवण्यासाठी पोलिसांशी सातत्याने समन्वय ठेवला.

गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र सिंह खांडाडे यांच्याशी नियमित संपर्क ठेवला. फसवणुकीची रक्कम शोधून पीडितांना परत मिळेपर्यंत तपास सुरू ठेवण्याचा आग्रह त्यांनी धरला.

Fraud Money Returned
Mumbai CSMT News|सीएसएमटी स्थानकावर छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

भंडाऱ्यापासून बिहारपर्यंत पोलिसांचा तपास

या प्रकरणाचा तपास करताना पीएसआय वीरेंद्र सिंह खांडाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यासह बिहारमध्येही तपास मोहीम राबवली.

या कारवाईत भंडारा येथून १.६८ लाख रुपये, तर बिहारमधून ९८ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले. याशिवाय फसवणुकीला बळी पडलेल्या पंकज जैन यांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधल्याने त्यांनी पाठवलेले ४९ हजार रुपये बँकेकडून वेळीच गोठवण्यात आले. त्यानंतर ही रक्कम त्यांना परत मिळाली.

अशा प्रकारे एकूण ३.१५ लाख रुपये सुरक्षित करण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित ६७ हजार रुपये आरोपींनी काढून घेतल्याचे समोर आले असून, ही रक्कम परत मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

'केवळ तक्रार करून जबाबदारी संपत नाही'

या प्रकरणाचा यशस्वी तपास केल्याबद्दल शायना एन.सी. यांनी गामदेवी पोलीस पथकाचे विशेष कौतुक केले. पोलीस अधिकाऱ्यांनी रक्कम परत मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल आपण मनापासून आभारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, ''माझ्या नावावर आणि प्रतिष्ठेवर विश्वास ठेवून परिचितांनी आपली कष्टाची कमाई गमावली होती. त्यामुळे त्यांना पैसे परत मिळवून देणे ही माझी नैतिक जबाबदारी होती. केवळ तक्रार दाखल करून आपली जबाबदारी संपत नाही. पीडितांना न्याय मिळेपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे.''

Fraud Money Returned
Mumbai News: मुंबईत धक्कादायक घटना! १० वर्षांच्या मुलीने १८ महिन्यांच्या चिमुरडीला सहाव्या मजल्यावरून ढकलले; CCTV व्हिडिओ समोर

सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर तातडीने संपर्क साधा

सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही शायना एन.सी. यांनी केले. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. घटनेची वेळेत तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम संबंधित बँक खात्यांमध्ये गोठवून वाचवण्याची शक्यता वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले.

सायबर गुन्ह्यांचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी नागरिकांनी एकजुटीने या आव्हानाचा सामना करण्याचे आवाहन केले. सायबर गुन्हे पूर्णपणे रोखण्यासाठी वेळ लागणार असला, तरी जागरूकता आणि सामूहिक प्रयत्नांतून अशा गुन्ह्यांना आळा घालता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.