Mumbai Luxury Homes | मुंबईत आलिशान घरांच्या विक्रीत मोठी वाढ

Mumbai Luxury Homes |
Mumbai Luxury Homes | मुंबईत आलिशान घरांच्या विक्रीत मोठी वाढ
Published on
Updated on

मुंबई : एका बाजूला मुंबईतील घरांच्या किमती वाढत असताना महागड्या घरांना मिळणारा प्रतिसादही चांगला आहे. २०२६च्या पहिल्या सहामाहीत मुंबईतील ८० हजार २२१ घरांची विक्री झाली. यात १ कोटी आणि त्याहून अधिक किंमतीच्या १८ हजार ६३७ घरांचा समावेश आहे.

यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत ८० हजार २२१ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये ६ टक्के वाढ झालेली दिसून आली. १० ते २० कोटी किमतीच्या घरांच्या विक्रीत ७० टक्के तर २० ते ५० कोटी किमतीच्या घरांच्या विक्रीत ७३ टक्के वाढ झाली. ५ ते १० कोटी किमतीची घरे २० टक्के अधिक प्रमाणात विकली गेली. एक ते २ कोटी किमतीच्या घरांच्या विक्रीतही १३ टक्के वाढ झाली. २ ते ५ कोटी किमतीच्या घरांच्या विक्रीत मात्र केवळ ५ टक्के वाढ झाली. नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालातून हे चित्र स्पष्ट झाले आहे.

दररोज १६ आलिशान घरांची विक्री

एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत १४ हजार ९०३ कोटी एकूण मूल्याच्या १ हजार ४९९ आलिशान मालमत्तांची नोंदणी झाली. याचाच अर्थ दररोज सरासरी १६ आलिशान घरांची विक्री झाली. त्यांचे एकत्रित मूल्य १६४ कोटी रुपये होते.

लाईटहाऊस लक्झरीने 'झॅपकी' या मालमत्ता नोंदणी व्यासपीठाच्या सहकार्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. मे महिन्यात व्यवहारांचे प्रमाण २२.७ टक्क्यांनी घटून ४३५ नोंदणींवर आले. त्यांचे एकत्रित मूल्य ४,४९२ कोटी रुपये आहे. यातील प्रत्येक घराची सरासरी किंमत १०.३ कोटी आहे. जून महिन्यात व्यवहारांच्या संख्येत ५०१ नोंदणी झाली. यावेळी प्रत्येक घराची सरासरी किंमत ९.४ कोटी होती. एकूण मूल्य ४,६८६ कोटींवर पोहोचले.

आलिशान घरांत वरळी आघाडीवर

एप्रिल ते जून या काळात एकट्या वरळीत ९७ व्यवहार झाले असून त्यांचे एकत्रित मूल्य २,२७२ कोटी आहे. प्रत्येक घराची सरासरी किंमत २३.४ कोटी आहे. लोअर परळमध्ये ७६९ कोटींचे ८१ व्यवहार झाले. यात ९.५ कोटींच्या घरांचा समावेश आहे.

विक्रमी मुद्रांक शुल्क

यावर्षी पहिल्या सहामाहीत झालेल्या प्रचंड विक्रीचा परिणाम म्हणून एकूण ६ हजार ९६८ कोटी मुद्रांक शुल्क जमा झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ४ टक्के वाढ झाली.

२०१३ नंतरच्या व्यवहारांचा विचार करता वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जमा झालेले हे सर्वाधिक मुद्रांक शुल्क आहे.

logo
Pudhari News
pudhari.news