

मुंबई: एसआयआर कामासाठी शिक्षकांची बीएलओ म्हणून पूर्णवेळ नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षक व संघटनांकडून याला तीव्र विरोध होत असतानाही मुंबई महापालिकेने ९ जुलैपासून सर्व शाळा अर्धा दिवस भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिक्षकांना अर्धा दिवस शाळेतील काम केल्यानंतर बीएलओच्या कामासाठी जाता येणार आहे.
निवडणूक आयोगामार्फत १६ राज्यांसह तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर कार्यक्रम हाती घेतला आहे. मतदार संघाच्या याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी तसेच हा कार्यक्रम विहीत कालावधीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी शिक्षकांना सुटीच्या दिवशी तसेच शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर बीएलओ म्हणून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामुळे सर्व शिक्षक व संघटनांकडून पूर्णवेळ एसआयआरचे काम करण्यास तीव्र विरोध करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता शिक्षण उपायुक्त यांनी ६ जुलै रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या सर्व शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याबाबत मौखिक आदेश दिले आहेत. त्यानुसार ९ जुलैपासून मुंबई महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येणार आहे.
या सर्व शाळा अर्धा दिवसच भरणार आहेत. त्यानुसार सोमवार ते शनिवार या कालावधीमध्ये सकाळच्या सत्रातील शाळा ७.१५ ते ११.२५ तर दुपारच्या सत्रातील शाळा ११.३५ ते ३.४५ आणि नियमित अधिवेशानातील शाळा १०.३५ ते २.४५ या कालावधीत भरणार आहे.
एसआयआरच्या कामासाठी तयार करण्यात आलेले हे वेळापत्रक तात्पुरते असून, मुख्याध्यापकांनी यानुसार वर्ग वेळापत्रक तयार करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
तसेच ज्या शिक्षकांना एसआयआरच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली नाही, अशा शिक्षकांनी पूर्णवेळ उपस्थित राहून उर्वरित कालावधीत अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सराव, शिष्यवृत्ती परीक्षेची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घ्यायची असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.