

Educational Supplies Discount
मुंबई : दोन महिन्याच्या सुट्टीनंतर 16 जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी मुंबईतील बाजारपेठेत पालकांची गर्दी होत आहे. पालकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे कागदाच्या किमती कमी झाल्याने या वर्षी पुस्तके आणि वह्यांचे दर सुमारे 10 टक्क्यांनी कमी झाले आहेत. असे असले तरी इतर पट्टी, पेन्सिल, कंपास, स्कुल बॅग यांचे दर मागील वर्षीप्रमाणे स्थिर आहेत.
काळबादेवी परिसर, दादर, डोंबिवली, ठाणे येथील बाजारपेठेत शालेय साहित्याचे विक्रेते आहेत. हे व्यापारी वसई-विरार येथील घाऊक बाजारांतून तसेच भिवंडी येथील कारखान्यांतून शालेय साहित्य खरेदी करतात. शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश, नवे बूट, दफ्तर, वह्या-पुस्तके या शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची विविध मार्केटसह डीमार्ट व स्टेशनरीच्या दुकानामध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे.
डोंबिवलीतील जुने शालेय पुस्तक विक्रेते एन. एस. मोडक यांनी सांगितले कि, गेल्या दोन वर्षांपासून एकात्मिक पद्धतीची पुस्तके येत होती. त्याचे दरही जास्त होते. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयामुळे या वर्षीपासून एकात्मिक पुस्तके बंद झाली. आता पूर्वीसारखी प्रत्येक विषयाची स्वतंत्र पुस्तके आली आहेत. त्यात कागदाच्या किंमती कमी झाल्या. त्यामुळे वह्यांसह शालेय पुस्तकांचे दरही कमी झाले आहेत.
डीमार्ट व मॉलमध्ये शैक्षणिक वस्तूंवर आकर्षक 20 ते 30 टक्के सूट, बॅग आणि टिफिन, बॉटल्स खरेदीवर 20 ते 40 टक्के सूट दिली आहे. त्यामुळे वस्तूंच्या किमती कमी असल्याने येथे जाऊन खरेदी करण्याला पालकांनी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे.
चित्रकला वही 30 ते 70
रंग 10 ते 80
कंपास 150 ते 400
टिफिन 99 ते 600
पाणी बॉटल 50 ते 550
पेन्सिल बॉक्स 40 ते 80
पेन बॉक्स 10 ते 250
यंदा पुस्तके, वह्या यांचे दर कमी झाल्याचे ऐकले. त्यामुळे थोडा दिलासा आहे. पुढील आठवड्यात खरेदीसाठी गर्दी वाढेल. त्यामुळे आम्ही शालेय साहित्य खरेदी करणार आहोत.
सरिता धोंडमिसे, पालक
याही वर्षी शैक्षणिक साहित्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वह्यांच्या किमती कमी झाल्या असल्या तरी इतर पट्टी, पेन्सिल, कंपास यांचे दर स्थिर राहिले आहेत.
निकुंज शहा, जनता बुक डेपो, कुलाबा