

Mumbai Airport Transport
मुंबई : मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 मधून प्रवास करणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रीपेड रिक्षासेवा जून महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. 1 जूनपासून प्रीपेड रिक्षा सुरू होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्या महिन्यात केली होती; मात्र काही कामे शिल्लक असल्याने या सेवेसाठी प्रवाशांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रीपेड रिक्षा सेवेसाठी आवश्यक असलेल्या राज्य सरकार, एमएमआरटीए आणि इतर प्राधिकरणांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. रिक्षाची मागणी नोंदवताना पैसे भरण्यासाठी आवश्यक असलेली संगणकीय प्रणाली, पैसे भरल्याची पावती देणारे केंद्र, अपंगांसाठी राखीव आसने, सामान वाहून नेण्याची व्यवस्था यांची कामे आणि इतर आवश्यक कामे शिल्लक आहेत.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) विविध ठिकाणच्या प्रवासासाठी दरपत्रक निश्चित केले आहे. हेच दरपत्रक प्रीपेड रिक्षाच्या संगणकीय प्रणालीमध्ये जोडले जाईल. प्रीपेड रिक्षातळाचे संचालन करण्यासाठी ’हॅप्पी टू हेल्प’ या स्वयंसेवी संस्थेला सहाय्यक हे काम मिळणार असून, उपक्रमाचे एकूण संचालन व देखरेख विमानतळ प्रशासनातर्फेच केली जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून टर्मिनल 2 वरून प्रवास करणार्या प्रवाशांना रिक्षावाल्यांच्या मनमानीला सामोरे जावे लागत आहे. काही वेळा प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात रिक्षातून उतरवले जाते. प्रीपेड रिक्षांमुळे या घटना टाळता येतील. उर्मट आणि मनमानी रिक्षाचालकांना यामुळे आळा बसू शकेल. त्यांना प्रवाशांकडून अतिरिक्त भाड्याची मागणी करता येणार नाही.