

Mumbai SC Reservation Demand
मुंबई : मुंबई महापालिकेत 227 पैकी 32 वॉर्ड अनुसूचित जातींसाठी आरक्षित करण्याची मागणी करताना माजी मंत्री विजय गिरकर यांनी या प्रवर्गाच्या मुंबईतील लोकसंख्येचे गणितच शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडले.
मुंबई जिल्ह्यातील 6 लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जाती (एस.सी) सुमारे साडेआठ लाख ते 9 लाख मतदार आहेत. मुंबईची लोकसंख्या सध्या सुमारे दीड कोटी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ही सुमारे 60 लाख इतकी आहे. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात ईशान्य लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक अनुसूचित जातीचे अडीच लाख मतदार आहेत, त्या पाठोपाठ उत्तर मुंबई लोकसभा व दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात दीड ते पावणे दोन लाख मतदार आहेत.
मुंबईच्या सहा लोकसभेचा विचार केला तर साधारणतः 8 लाख 50 हजार ते 9 लाख मतदार आहेत. 13 टक्के अनुसूचित जातीत दलित,मातंग, ढोर, चर्मकार, खाटिक अशा जातींचा समावेश आहे.
मुंबई जिल्ह्यात धारावी,कुर्ला चेंबूर, मानखुर्द ,विक्रोळी, घाटकोपर पूर्व या ठिकाणी मुंबई महापालिका अनुसूचित जाती आरक्षणाचे वॉर्ड आहेत.
महापालिकेचे 227 वॉर्ड आहेत.13 टक्के अनुसूचित जाती आरक्षणप्रमाणे वॉर्ड मिळायला हवेत. सध्या 2017 प्रभाग पुनर्रचनेनुसार 15 वॉर्ड अनुसूचित जातीचे आहेत. हा अन्याय असून ही संख्या 32 वर न्यावी अशी भूमिका गिरकर यांनी मांडली.