

मुंबई : मुंबई शहर व उपनगरात रस्त्यांच्या कामासह अन्य कामासाठी १ ऑक्टोबरपासून खोदण्यास परवानगी देण्यात येते. पण यावेळी पाऊस घेऊन ऑक्टोंबर उजाडल्यामुळे रस्ते खोदकामाची परवानगी लांबणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान परवानगी देण्यासाठी पाऊस जाण्याची प्रतीक्षा असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू असून पावसाळ्यामुळे ही कामे सध्या बंद आहेत. मुंबईत १ जून ते ३९ सप्टेंबरपर्यंत रस्ते खोदण्यास बंदी असते. ही बंदी दरवर्षी १ ऑक्टोबरपासून उठवली जाते. परंतु यावेळी मुंबईत अजून पर्यंत पाऊस परतीच्या प्रवासाला न निघाल्यामुळे रस्ते खोदणे अडचणीचे जाऊ शकते. ऐन पावसात रस्ते खोदल्यास त्याचा त्रास मुंबईकरांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून रस्त्यांसह अन्य कामांसाठी खड्डे खोदल्या सध्या तरी परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तातडीने खड्डे खोदण्यास पुन्हा परवानगी देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई शहरात खोदकामाला सध्या परवानगी मिळणार नसल्यामुळे शहरात सुरू असलेली सिमेंट काँक्रेट रस्त्यांसह अन्य कामे रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत नवीन जलवाहिन्या टाकण्याचा मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय नाल्याचे रुंदीकरण नवीन गटार बनवणे व अन्य कामेही सुरू असून ही कामे पूर्ण सुरू करण्यासाठी खड्डे खोदणे आवश्यक आहे. त्यामुळे कंत्राटदारांना खोदकामाला परवानगी मिळण्याची आता प्रतीक्षा आहे.
खड्डे खोदकामासाठी परवानगी मिळावी यासाठी रस्ते कंत्राटदारासह अन्य कंत्राटदारांची पत्र आली आहेत. या पत्रानुसार महापालिकेकडून परवानगी देण्यात आली तरी पाऊस पूर्णपणे जाईपर्यंत खोदकाम करू नये, अशी अट टाकण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.