

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात रुग्णसंख्या कमी झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कधी मुसळधार, कधी संततधार पाऊस सुरू असल्याने साथीच्या आजार वाढले. परिणामी, रूग्णसंख्या वाढली. डेंग्यूची रूग्णसंख्या दुप्पटीने वाढली आहे. यामध्ये डेंग्यूचे सर्वाधिक 979 रुग्ण सापडले तर मलेरियाचे 840, लेप्टोचे 52, चिकनगुनियाचे 86, हेपेटायटीस 73 रुग्ण , गॅस्ट्रोचे 229 रुग्ण सापडले आहेत.
मुसळधार पाऊस आणि त्यानंतर उघडीप यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजारांच्या वाढीसाठी वातावरण तयार झाल्याने रूग्णसंख्या वाढली आहे. सप्टेंबरमध्ये रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. पावसाने हजेरी लावल्याने रूग्णसंख्या वाढली आहे. ताप आल्यास महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाना, बाळासाहेब ठाकरे आपला रुग्णालयामध्ये जाऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.