

मुंबई: मुंबईतील २ हजार कि.मी. पैकी १ हजार ७०० किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. रस्ते आणि खड्डे दुरुस्तीचा ८० टक्के खर्च कमी झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मुंबई आणि परिसरातील पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे.
यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने आपत्ती नियंत्रणासोबतच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. नालेसफाईसोबतच होल्डींग पाँड, दरडप्रवण क्षेत्रात संरक्षण जाळी बसवणे, होर्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे.
एनडीआरएफच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने आपत्ती प्रतिसाद दल तयार करावेत. तर प्रशासकीय यंत्रणांनी टीम म्हणून काम करून पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा द्यावा, असे शिंदे म्हणाले.
मुंबई महापालिकेसह अन्य विभागांनी केलेले नियोजन मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी उपयुक्त ठरणार असून बेस्ट, एसटीने पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे. झाड कोसळून दुर्घटना होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी महापालिकेने दक्षता घेतली पाहिजे.
रेल्वेने रेल्वे ट्रॅकखालच्या नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने करावी. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये औषधांचा साठा करून ठेवावा. मेट्रो स्थानकांमध्ये पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. एनडीआरएफ, नौदल, वायुदल, लष्कर यांची प्रत्येकवेळी आपल्याला मदत होत असते. यांच्याशी समन्वय ठेवून आपत्ती काळात मुंबईकरांना दिलासा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.