मुंबईत पावसाचे ४ बळी, ५ तासांत २०० मिमी नोंद, १४ विमाने इतरत्र वळवली

Mumbai Rains | रस्ते पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत
Mumbai Rains
मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. (Image source- ANI)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

गेल्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरांत मुसळधार (Mumbai Rains) पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आज गुरूवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० पर्यंत मुंबईला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला होता. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे.

दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांत काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्‍याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार (IMD), मुंबईत आज ढगाळ हवामानासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू, १४ विमाने उड्डाणे वळवली

द टाईम्स इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईत पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून पाच तासांच्या कालावधीत, मुंबई उपगनगरांतील काही भागांमध्ये सुमारे २०० मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे रस्त्यावरील तसेच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच १४ विमान उड्डाणे दुसऱ्या विमानतळावर वळवण्यात आली आहेत.

चेंबरमध्ये पडून पवईतील महिलेचा मृत्यू

मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सिपज कंपनी गेट क्रमांक ३ समोरील रस्त्यावरील उघडया चेंबरमध्ये पडून पवईतील मिलिंद नगर येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. विमल अप्पाशा गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे.

पाच तासांत मुंबईत २०० मिमी पाऊस

गेल्या २४ तासांत मुंबई शहरात ११७ मिलिमीटर, पूर्व उपनगरांत १७० मिमी. आणि पश्चिम उपनगरांत १०८ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या काही भागांमध्ये बुधवारी सांयकाळी ५ ते रात्री १० च्या दरम्यान सुमारे २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पवई येथे २३४ मिमी, घाटकोपर २५९ मिमी आणि मानखुर्दमध्ये २७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी गुरुवारी सकाळी ८:३० पर्यंत रेड अलर्ट दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news