

Mumbai Rains Central Western Harbour Railway Update Today
मुंबई : आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर मंगळवारी दुपारी सीएसएमटी आणि ठाणे स्टेशनदरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली असून हार्बर रेल्वेवरही वाशीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या बंद आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे.
मुंबई शहर व उपनगरात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने मंगळवारी अक्षरश: कहर केला. मंगळवारी पहाटे मुंबईत 185 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईतील मिठी नदीने इशारा पातळी ओलांडली असून कुर्ला पुलाजवळील क्रांती नगरमध्ये NDRF ची टीम दाखल झाली आहे. नागरिकांना स्थलांतर होण्याचं आवाहन केले जात आहे. दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवेलाही या पावसाचा फटका बसला आहे.
मध्य रेल्वेवरील परिस्थिती काय आहे?
मुंबई परिसरात मुसळधार पाऊस आणि रुळावर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. ठाणे - कर्जत, खोपोली आणि कसारा स्थानकादरम्यान शटल सेवा सुरू असल्याचंही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पश्चिम रेल्वेवरील परिस्थिती काय आहे?
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू रोड या मार्गावरील रेल्वेसेवा सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. लोकल सेवा विलंबाने धावत असल्या तरी कार्यालयांना सुटी जाहीर झाल्याने लोकल ट्रेनमध्ये फारशी गर्दी नव्हती. तर दुपारी दोनच्या सुमारास विरार ते वसई दरम्यान सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक मंदावली आहे.
हार्बर रेल्वेवरील परिस्थिती काय आहे?
हार्बर रेल्वेवरी सीएसएमटी ते कुर्ला या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. चुनाभट्टी येथे रेल्वे रुळावर पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक पुढील सुचनेपर्यंत बंद करण्यात आली आहे. वाशी स्थानकावरही
रेल्वे वाहतूक कोणत्या स्थानकांपर्यंत सुरू आहे?
हार्बर मार्गावर पनवेल- वाशी या स्टेशनदरम्यान, ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे- वाशी आणि मध्य रेल्वेवरील ठाणे- कल्याण- कसारा तसेच ठाणे- कल्याण- कर्जत या स्टेशनदरम्यानची वाहतूक सुरू आहे. तसेच सीएसएमटी - गोरेगाव - सीएसएमटी हार्बर लाईन सेवा दुपारी दोनच्या सुमारास पूर्ववत करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर झाल्याने तिन्ही मार्गावरील प्रवाशांची संख्या कमी आहे.
मध्य रेल्वेच्या रिशेड्युल झालेल्या लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या
११०११ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धुळे एक्स्प्रेस रद्द
१२०७१-जनशताब्दी एक्स्प्रेस - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हिंगोली रद्द
२२१५९- छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस - एम. जी.आर. चेन्नै सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द
१२१८८-छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस - जबलपुर गरीब रथ एक्सप्रेस रद्द