

Mumbai Rain
मुंबई: मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेला बसला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर माती खचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तुर्भे आणि कोपरखैरणे स्थानकांदरम्यान रुळांखालील माती खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून 'अप' आणि 'डाऊन' दोन्ही मार्ग असुरक्षित घोषित करण्यात आले आहेत. सध्या मध्य रेल्वेकडून घटनास्थळी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुसरीकडे, दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
नवी मुंबईत पावसाची संततधार सुरूच आहे. उलवे परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. येथील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेतही पाणी साचले असून, मुख्य प्रवेशद्वाराजवळच पाणी भरल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी साचल्याने प्रशासनाच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कोपरखैरणे ते घणसोली दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती वाहून गेल्याने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद आहे. दोन्ही मार्गिका पाऊण तासांपासून बंद आहेत. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून, वाहतूक पूर्ववत होण्यास अजून काही वेळ लागण्याची शक्यता आहे. पहिल्याच पावसाचा रेल्वेला मोठा फटका बसल्याने नोकरदार आणि प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचा थेट परिणाम लोकल सेवांवर झाला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळेतच हा खोळंबा झाल्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. रेल्वे प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे.