Maharashtra Monsoon Update : मान्सून गतिमान! दिवसात ८० टक्के महाराष्ट्र व्यापला, ५ दिवस अतिवृष्टीचा इशारा

Heavy Rain Alert Maharashtra : हवेचे दाब अनुकूल असल्याने वेग वाढला
Maharashtra Monsoon Heavy Rain Alert Maharashtra
Published on
Updated on

पुणे : ‘तो आला, त्‍याने पाहिले आणि जिंकून घेतलं सारं...’ या उक्‍तीप्रमाणे सोमवारपासून सक्रिय झालेल्‍या मान्‍सूनने बघता बघता एका दिवसात ८० टक्‍के महाराष्‍ट्र कवेत घेतला. महाराष्‍ट्रात आल्‍यानंतर रेंगाळलेला मान्‍सून सोमवारपासून कमालीचा वेगवान झाला. सध्‍या त्‍याचा वेग प्रचंड असून अवघ्या २४ तासांत मंगळवारी त्याने राज्याचा ८० टक्के भाग व्यापला.

मुंबईसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा बराचसा भाग अधिपत्‍याखाली आला असून फक्त नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात तो जायचा बाकी आहे. त्यामुळे राज्यात आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते या आठवड्यातच धरणात मोठ्या पाण्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे.

सोमवारी, २२ जून रोजी मान्सून पुण्यात दाखल झाला. त्यानंतर ४८ तासांत मुंबईत जाईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र मान्सूनने मंगळवारी (२३ जून) मुंबई शहर व राज्याचा ७५ टक्के भाग व्यापला. मुंबईपाठोपाठ संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा कवेत घेतला. उत्तर महाराष्ट्रातील फक्त धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात जायचा बाकी आहे. मान्सूनचा वेग इतका प्रचंड आहे की, या आठवड्यात राज्यातील बहुतांश धरणांत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे.

यंदा मान्सूनचा प्रवास राज्यात खूप उशिरा सुरू झाला. साधारणपणे १९ जून पर्यंत तो मराठवाड्यात पोहोचतो तर २५ जूनच्या आसपास तो विदर्भ काबीज करतो. मात्र मान्सून उशिरा सक्रिय होऊन २४ तासांत ८० टक्के महाराष्ट्र पार केला. एकाच दिवसात मुंबईसह मराठवाडा, विदर्भ काबीज केला. यापुढे तो गुजरात आणि मध्य प्रदेशात जाण्याच्या तयारीत आहे.

राज्यात हवेचे दाब १००६ वरून १००४ हेक्‍टा पास्कल इतके खाली आले आहेत. त्यामुळे मान्सून प्रचंड वेगाने पुढे जात आहे. मंगळवारी मान्सूनने ७५ ते ८० टक्के महाराष्ट्र व्यापला. अख्खा विदर्भ व्यापून तो आता उत्तर महाराष्ट्रात पोहोचला आहे. त्यामुळे आगामी तीन ते चार दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news