

मुंबई : शहर व उपनगरात पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी ही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासात सकाळी ८ वाजेपर्यंत शहर विभागात १२६ मिमी, पूर्व उपनगरात ११० मिमी आणि पश्चिम उपनगरात ११४ मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबईत उशिरा पाऊस दाखल झाला असला तरी गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला होता. सकाळी थोडा जोर कमी झाला मात्र अवघ्या तीन-चार तासांमध्ये ६० ते ६५ मिमी पावसाची नोंद झाली.
पश्चिम द्रुतगती महामार्गासह उपनगर व शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळी वाहतूक कोंडी होती. मध्य व पश्चिम रेल्वेच्या लोकल ही पाच ते दहा मिनिट विलंबाने धावत होत्या. दरम्यान दुपारी अरबी समुद्राला मोठी भरती असल्यामुळे महापालिकेने सतर्क राहण्याच्या सूचना जीव रक्षकांचा अग्निशमन दल व पालिकेच्या आपत्कालीन विभागाला दिल्या आहेत.