

Mumbai Pune Expressway Traffic Update
लोणावळा: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ डोंगरावरील माती व काही झाडेझुडपे रस्त्यावर आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच बोरघाट महामार्ग पोलीस व आयआरबी यंत्रणा यांनी घटनास्थळी दाखल होत रस्त्यावर आलेली माती व झाडे बाजूला काढण्याचे काम हाती घेतले आहे याकरिता मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे.
लोणावळा खंडाळा व रायगड जिल्हा या घाटमाथा परिसरामध्ये गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे डोंगरावरून माती व त्यासोबतच काही झाडेझुडपे रस्त्यावर वाहून आली. मागील सात ते आठ वर्षांपूर्वी खंडाळा घाट परिसरामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. त्यानंतर या सर्व परिसरामध्ये सुरक्षा करता जाळ्या लावण्यात आल्या होत्या तेव्हापासून दरड रस्त्यावर येण्याचे प्रकार थांबले होते.
शुक्रवारच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात दगड जरी रस्त्यावर आले नसले तरी डोंगराची माती ही घसरून रस्त्यावर आली आहे. येत्या काळामध्ये या परिसरामध्ये दरड अथवा माती रस्त्यावर येऊ नये याकरता सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत वाहन चालक व्यक्त करत आहेत.