

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ज्वलनशील वायूचा टँकर उलटून झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना झालेला त्रास लक्षात घेत भविष्यात अशा घटना घडू नयेत, घडल्यास कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करून शिफारशींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.
या टँकरमध्ये प्रॉपेलिन हे अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याचे लक्षात आल्याने यंत्रणा सतर्क झाली. एखादी छोटी ठिणगी पडली तरी अतिज्वलनशील वायूमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने दुर्घटनास्थळी तज्ज्ञांना बोलावण्यात आल्याची माहिती राज्य सरकारमधील सूत्रांनी दिली.
तज्ज्ञ समितीच्या पाहणीनंतर राज्य सरकारने भारत पेट्रोलियम आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांना पाचारण केले. या दोन्ही यंत्रणांच्या पथकांनी बुधवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली आहे. अपघातग्रस्त टँकरमधील गळती थांबविणे तसेच टँकरमधील रसायन दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यास प्राधान्य देण्यात आले.
बुधवारी दुपारपर्यंत अपघातग्रस्त टँकरचे दोन व्हॉल्व्ह बंद करण्यात बचाव पथकांना यश आले. मात्र, अद्यापही एका ठिकाणाहून गळती सुरु असून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. प्रोपेलिनसारख्या घातक रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या अपघाताची ही अशाप्रकारची पहिलीच घटना असल्याचे समजते. येथे ठिणगी पडून अथवा घर्षणामुळे भडका उडणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक होते. त्यामुळे संबंधित मार्गिका बंद करून टँकर रिकामे करण्याचे काम सुरू होते.