

नवी दिल्ली ः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नसल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी तीव्र आणि आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. लोकसभेत बुधवारीही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होऊ शकले नाही. परिस्थिती इतकी तणावपूर्ण राहिली की, लोकसभेचे कामकाज अखेर गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून विरोधकांचा गोंधळ सुरू होता. विरोधक वेलमध्ये घुसले आणि घोषणाबाजी सुरू ठेवली, ज्यामुळे सभागृह दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. दुपारी 12 वाजता कामकाज पुन्हा सुरू होताच, विरोधकांनी निदर्शने सुरू ठेवली, प्रथम दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर 5 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करावे लागले.
पंतप्रधान मोदी यांचे उत्तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत देण्यात येणार होते. यासाठी सत्ताधारी पक्षाने जय्यत तयारी केली होती. दुसऱ्या बाजूला विरोधकांनी पंतप्रधानांच्या भाषणाला जोरदार विरोध करण्याचीही तयारी केली होती. सायंकाळी 5 वाजता सभागृह पुन्हा सुरू होताच, सभापतींच्या पॅनलमधील सदस्या सुधा राय अध्यक्षपद भूषविण्यासाठी आल्या.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या जागी राय आल्याने पंतप्रधानांचे भाषण होणार नसल्याचे संकेत मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दोन वरिष्ठ मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या अनुपस्थितीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. सुधा राय यांनी भाजप खासदार राजेंद्र अग्रवाल यांना बोलण्यास सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये घुसून घोषणाबाजी सुरू केली.
पंतप्रधानांच्या भाषणाचा निषेध करण्यासाठी सज्ज झालेल्या विरोधी पक्षांनी विविध बॅनर आणि पोस्टर्स आणले. त्यांनी ट्रेझरी बेंचवर कूच केली आणि त्यांचे बॅनर लावले. विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून अध्यक्ष राय यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृह तहकूब केले.
प्रियांका गांधींनी आखली रणनीती
पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षाची रणनीती आखण्याचे काम प्रियांका गांधी यांना सोपवण्यात आले होते. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी त्यांनी सर्व महिला काँग्रेस खासदारांसोबत एक रणनीती आखली. सर्व महिला खासदारांना पंतप्रधान मोदींच्या आसनासमोरील ट्रेझरी बेंचकडे बॅनर घेऊन निषेध करण्यास सांगण्यात आले. शिवाय, या महिला भाजप खासदार निशिकांत दुबे यांनाही लक्ष्य करत होत्या. त्यांनी निशिकांत दुबे यांच्या आसनावर जाऊन घोषणाबाजी करण्याची योजना आखली होती.
महिला खासदार दुबेंविरोधात आक्रमक
सभागृह सायंकाळी 5 वाजता सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांनंतर लगेचच ते गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस महिला खासदारांचा गट, ज्यामध्ये मुंबई उत्तर मध्यच्या खासदार वर्षा गायकवाड, तामिळनाडूच्या ज्योतिमणी सेन्नीमलाई आणि इतर अनेक महिला खासदारांनी ट्रेझरी बाकांमधून प्रवेश केला आणि निशिकांत दुबे यांच्या आसनाकडे जाण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दुसऱ्या रांगेत बसलेले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काँग्रेस महिला खासदारांना हात जोडून मागे हटण्याची विनंती केली. त्यानंतर महिला खासदारांनी दुबे यांना पुढे येण्याचे आव्हान दिले. तथापि, खासदारांचा आक्रमक पवित्रा पाहून परिस्थिती बिकट होऊ शकते हे लक्षात येताच दुबे हळूहळू त्यांच्या आसनावरून उठले आणि भाजप खासदारांमध्ये जाऊन मिसळले. दुबे यांना भाजप खासदारांनी सभागृहाबाहेर नेले.
अहिल्यादेवींचे पोस्टर घेऊन समाजवाद्यांनी केला निषेध
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह बहुतेक विरोधी खासदारांनी माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचे पोस्टर हातात धरले होते. अहिल्यादेवी होळकर यांचा वाराणसीतील पुतळा पाडल्याच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाचे खासदार अहिल्यादेवींचे पोस्टर हातात घेत निषेध नोंदवला. मणिकर्णिका घाटावरील अहिल्यादेवींचा पुतळा कोणत्याही योग्य नियोजनाशिवाय पाडण्यात आला, असा आक्षेप यावेळी घेण्यात आला.
नेहरूंवर अपमानास्पद टिपणी
दुपारी 2 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर, गोंधळाच्या वातावरणात, निशिकांत दुबे यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी देण्यात आली. काही पुस्तकांचा उल्लेख करून त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद टिपणी केली. यामुळे काँग्रेस सदस्य संतप्त झाले. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आणि दुबे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. जोपर्यंत विरोधी पक्षनेत्याला सभागृहात बोलू दिले जात नाही, तोपर्यंत पंतप्रधान मोदींना बोलू द्यायचे नाही, असा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.