मुंबई : दिवाळीसाठीच्या घरोघरी करण्यात येत असलेल्या रोषणाईवर चिनी बनाटवटीच्या साहित्याचा छाप आता संपली आहे. यावर्षी भारतीय बनावटीचे मुबलक साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. दादर, मंगलदास मार्केट, लालबाग, क्रॉपर्ड मार्केटसह मुंबई उपनगरातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या आहेत. रोषणाईच्या साहित्याचे दरही स्थिर आहेत.
पंतप्रधानांच्या स्वदेशी साहित्य खरेदीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय बनावटीच्या साहित्याची यावर्षी दिवाळी बाजारात छाप दिसत आहे. पिकोला पट्टा, इंडियन लटकन, प्लॉवर रोपलाईट, कटन आदी नवीन साहित्याची भर पडली असून याला ग्राहकांची मागणी आहे. आकर्षक आणि आधुनिक विद्युत माळा उपलब्ध आहेत. भारतीय बनावटीचे विद्युत माळांना 70 टक्के ग्राहकांची पसंती असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
दरवाजाला लावण्यासाठी इंडियन लटकन, पिकोला पट्टा तर प्लॉवर तोरण, रोपलाईट असे आकर्षक व मल्टिकलर विद्युत माळांचे नवीन प्रकार यावर्षी बाजारात आले आहेत. मंगलदास मार्केट, दादर या ठिकाणच्या प्रमुख बाजारपेठेमध्ये विद्युत माळा खरेदीसाठी गर्दी होत आहे. सर्वसामान्यांना परवडणारे दर याठिकाणी आहेत.
स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी भारतीय बनावटीच्या विद्युत माळांची मागणी वाढली आहे. या विद्युत माळा क्रॉफर्ड मार्केटमध्ये तयार केल्या जातात असे विक्रेते सूरज घराळ यांनी सांगितले.
फटाक्याची आवाजाची माळ
विद्युत माळेमध्ये फटाका साऊंड ही माळ बाजारात आली आहे. या माळेमध्ये फटाक्याच्या आवाज येऊन ती लखलखते. फटाका साऊंडची 1500 रुपये किंमत आहे. त्याला ग्राहकांची मागणी असल्याचे दादर मधील विक्रेते अमिन कुरेशी यांनी सांगितले.
दर असे?
पिकोला पट्टा : 700 ते 1000
इंडियन लटकन : 550 ते 1000
इंडियन तोरण : 500
प्लॉवर माळ : 250
स्टार (चांदणी) : 300
साधे तोरण : 400
रोपलाईट - 250 ते 300
चौकटीला लावणारे कटन : 550
विद्युत माळा : 250 ते 350
शुभ दिपावली, हॅपी दिवाळीची लाईट : 950
ड्रॉप लाईट : 480 रुपये