मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो प्रवाशांसाठी सिटीफ्लो या खासगी बस कंपनीशी भागीदारी केली असून भुयारी मार्गिकेच्या स्थानकांबाहेरून इच्छीतस्थळी जाण्यासाठी प्रवाशांना ही बससेवा दिली जाणार आहे. बेस्टला डावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मेट्रो प्रवाशांसाठी ही विशेष फीडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या प्रमुख स्थानकांबाहेर या बस चालवल्या जाणार आहेत. बीकेसी मेट्रो स्थानकावरून निघणारी बस एनएसई, जिओ गार्डन, वन बीकेसी आणि कौटुंबिक न्यायालय आदी प्रमुख ठिकाणांवरून जाईल.
वरळी येथील सेवा सेंच्युरी मिल्स, वन इंडिया बुल्स सेंटर, कमला मिल्स आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क या मार्गावरून जाईल. सीएसएमटी येथून ओल्ड कस्टम हाऊस, लायन्स गेट, एस.पी. मुखर्जी चौक, के.सी. कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो स्थानक येथे जाता येईल.
बीकेसी मेट्रो स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची रिक्षाचालकांकडून लूट केली जाते. यावर उपाय म्हणून मेट्रो स्थानकापासून बीकेसीत अन्यत्र जाण्यासाठी बेस्टच्या सेवा सुरू केल्या जाव्यात, अशी मागणी करणारे पत्र आमदार वरूण सरदेसाई यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना लिहिले आहे. तसेच एमएमआरसीने खासगी बससेवेसोबत भागीदारी करणे हे निरर्थक आहे. खासगी बससेवा हा पर्याय असू शकतो, ते अनिवार्य असू शकत नाही, असे सरदेसाई यांचे म्हणणे आहे.