Mumbai News
मुंबई : प्रभादेवी पूलबाधितांना ३० लाख ते १ कोटी १० लाखांपर्यंतचा मोबदला देण्यात येणार आहे; मात्र येथील घरांची किंमत त्यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचा दावा येथील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून फसवणूक होत असल्याची भावना येथील रहिवाशांमध्ये आहे.
प्रभादेवी पूल तोडून येथे दुमजली पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी २५ एप्रिलपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता; मात्र स्थानिक रहिवाशांनी आंदोलन करत पाडकामाला स्थगिती दिली. त्यामुळे सध्या या पुलावरून वाहतूक सुरू आहे. या पुलाच्या कामात दोनच इमारती बाधित होत असल्याचे एमएमआरडीएतर्फे सांगितले जात असले तरी एकूण १९ इमारती बाधित होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. १९ इमारतींमध्ये एकूण ४०० निवासी व अनिवासी गाळे आहेत.
दोन इमारतींतील ८४ बाधितांना ३० लाखांपासून ते १ कोटी १० लाखांपर्यंत भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. एमएमआरडीएने ठरवलेला दर रेडीरेकनरनुसार आहे; मात्र एवढ्या कमी किमतीत याच भागात पुन्हा घर मिळणे कठीण आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्काचा भरणाही करावा लागेल. त्यामुळे ही रक्कम रहिवाशांना तुटपुंजी वाटत आहे. तसेच इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर किमान ४०० चौरस फुटांचे घर मिळाले असते याचा विचार भरपाई धोरण ठरवताना करण्यात आलेला नाही. यामुळे भरपाईबाबत रहिवासी नाराज आहेत. त्यापेक्षा पुनर्विकास करावा, अशी त्यांची मागणी आहे.
५० चौरस फूट ते १२०० चौरस फुटांपर्यंतची घरे येथे आहेत. एसआरएमध्ये किमान सव्वा तीनशे चौरस फुटांची घरे मोफत दिली जातात. आमच्या इमारतींचा पुनर्विकास विकासकाने केला तर किमान ४०५ चौरस फुटांचे घर मिळेल. आज याच भागात ४०५ चौरस फुटांचे घर घ्यायचे असेल तर दीड कोटी खर्च येईल. आज मुंबईतील सर्वाधिक महाग घरे परळ, लालबाग याच परिसरात आहेत. ३० लाखांत दक्षिण मुंबईच काय उपनगरातही घर मिळणार नाही. त्यामुळे एमएमआरडीएकडून दिली जाणारी भरपाई तुटपुंजी आहे. त्यापेक्षा याच ठिकाणी पुनर्विकास करून आम्हाला घरे द्या.
- श्रीराम पवार, स्थानिक रहिवासी