

घाटकोपर : चेंबूर परिसरात हस्तीदंताची बेकायदेशीर तस्करी व विक्री करणाऱ्या टोळीचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ही मोठी कारवाई मानली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (दि.२२) रोजी चेंबूरच्या आरसी राहावे ताज लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये हस्तीदंताची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती त्यानंतर पोलिसाकडून सापळा रचण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आकाश अशोक आव्हाड(२८), संदीप रणधीर बिडलानी(३३), शशांक चंद्रशेखर रांजणकर(३८) आणि दिनेश राममनोहर अग्निवंशी(४०) यांना ताब्यात घेतले. पुढील तपासात नरेंद्र रघुनाथ सकपाळ(४१) याने हे त्यांना विकल्याने यालाही ब्रीच कँडी परिसरातून सापळा रचून अटक करण्यात आली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन मोठे हस्तीदंताचे तुकडे जप्त केले आहेत.याशिवाय ४ मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३ कोटी ५० लाख ४० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भारतीय दंड संहिता तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चेंबूर पोलीस करीत आहेत.