

Mumbai Police : रस्त्यावर कोणी मनोरुग्ण फिरतोय म्हटलं की, दुर्लक्ष करणे किंवा तुच्छतेने पाहणे, हे तसं सगळीकडचेच चित्र. मुंबईतही अशीच एक घटना घडली. एका मनोरुग्ण महिलेला अर्धनग्न अवस्थेत पाहून अनेकजण बघ्याची भूमिका घेत होते; पण याच गर्दीत खाकी वर्दीतील एकाने कर्तव्यपलीकडची माणुसकी दाखवली. त्या महिलेला कपडे दिले. ऐन नवरात्रीमध्ये व्हायरल होणार्या या व्हिडिओमुळे सर्वसामान्यांमध्ये मुंबई पोलिसांबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.
शहरात माणुसकीचा एक हृदयस्पर्शी अनुभवला. मुंबईतील वांद्रे येथील चौपाटीवर एक मनोरुग्ण महिला अर्धनग्न अवस्थेत फिरत होती. यावेळी हा ह्दयद्रावक प्रसंगी पाहून घटनास्थळी असणार्या महिला किंवा तरुणींनाही या मनोरुग्ण महिलेला मदत करावी, असे वाटलं नाही, त्यांनीही केवळ बघ्याची भूमिका घेतली. मात्र, याचवेळी गर्दीतील पोलीस कर्मचारी सुशील शिखरे यांनी माणुसकीचा धर्म जपला. त्यांनी निराधार महिलेला मदतीचा हात दिला. त्यांनी सर्वप्रथम त्या महिलेसाठी कपड्यांची व्यवस्था केली.
पोलीस कर्मचारी सुशील शिखरे यांनी केवळ आपले कर्तव्य बजावले नाही, तर खाकी वर्दीतील संवेदनशीलता आणि माणुसकीचा खरा अर्थ आपल्या कृतीतून दाखवून दिला. समाजातील दुर्बळ घटकांना मदत करणे हे पोलिसांचे कर्तव्य असले तरी, अनेकदा अशा प्रसंगांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, या पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेली माणुसकी खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. ऐन नवरात्रीमध्ये व्हायरल होणार्या या व्हिडिओमुळे सर्वसामान्यांमध्ये मुंबई पोलिसांबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.
मदत करणारा पोलीस कोण आहे?
मनोरुग्ण महिलेच्या मदतीसाठी धावणाऱ्या पोलिसाचे नाव सुशील शिखरे असे आहे. ते मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहे. सुशील हे तब्बल 21 वर्षांपासून पोलीस खात्यात सेवेस असून ते मूळचे साताऱ्याचे असल्याचे समजते.