Mumbai Robbery Case: पोलिस असल्याची बतावणी करून परदेशी महिलांना लुटले; ४८ तासांत ९७.५० लाखांची रोकड हस्तगत

९७.५० लाखांची रोकड ४८ तासांत हस्तगत, आझाद मैदान पोलिसांची कामगिरी
Mumbai Robbery Case
Mumbai Robbery CasePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: आपण पोलीस असल्याची बतावणी करून चाड (मध्य आफ्रिका) देशातील दोन परदेशी महिलांना लुटणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आझाद मैदान पोलिसांना यश आले. आरोपींनी महिलांकडील तब्बल ९७ लाख ५० हजारांची रोख रक्कम जबरीने हिसकावून पळ काढला होता.

पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या ४८ तासांत आरोपींना ताब्यात घेत संपूर्ण रक्कम हस्तगत केली. या कारवाईमुळे परदेशी नागरिकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला दारसिला मारजानदायक एन जामेना या चाड देशातील नागरिक आहेत. त्या आपल्या परदेशी मैत्रिणीसह मुंबईत आल्या होत्या. २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.१० ते ३.३५ च्या दरम्यान त्या धनजी स्ट्रीट येथून रोख रक्कम असलेल्या बॅगेसह टॅक्सीने कुलाब्याच्या दिशेने जात होत्या.

Mumbai Robbery Case
Mumbai Police Forensic Van: कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज सेवन करणारे १२ जण पोलिसांच्या जाळ्यात

यावेळी आरोपींनी स्कूटरवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. मेट्रो सिनेमाजवळ टॅक्सी अडवून आरोपींनी चालकाला आपण पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही महिलांनाही पोलिसांची बतावणी करून रोख रकमेची बॅग जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले.

या घटनेनंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात २० नोव्हेंबर रोजी रात्री ११.१९ वा. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४), ३१९, ३१७ (५), २४९ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासासाठी विविध पथके तयार करण्याचे निर्देश दिले.

Mumbai Robbery Case
Auto Rickshaw Strike: रॅपिडो बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा संप; पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत प्रतिसाद

अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, दक्षिण प्रादेशिक विभाग, पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, दक्षिण परिमंडळ-१ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर, पोलीस निरीक्षक अमृत पवार आणि पोलीस निरीक्षक नंदकिशोर जाधव यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.

आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेंबुर्ले, कळवा, ठाणे व अहिल्यानगर परिसरात तपासाची चक्रे फिरवली. अखेर ४८ तासांच्या आत अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथे आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात लुटलेली संपूर्ण ९७ लाख ५० हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.