

Mumbai News |
मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर नव्या पोलीस आयुक्तांच्या नावाची घोषणा होणार की आयुक्त पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात अन्य अधिकाऱ्याकडे सोपविला जाणार, याबाबत सध्या पोलीस प्रशासन आणि राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
१९८९ तुकडीचे अधिकारी अस-लेले विवेक फणसळकर आज मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त होत आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रथेप्रमाणे सकाळी नायगाव पोलिस मैदानावर त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ वाढविला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फणसळकरां पाठोपाठ १९९० च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवाज्येष्ठतेनुसार सदानंद दाते आणि संजयकुमार वर्मा या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडील काही महत्वाच्या प्रकरणांच्या तपासामुळे दाते यांच्याकडील विद्यमान जबाबदारीत बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. तर, निवडणुकांच्या आचारसंहितेच्या काळात वर्मा यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झाल्याने त्यांचे नावही मागे पडल्याची चर्चा आहे.
१९९२ च्या तुकडीतील रितेश कुमार, अमिताभ गुप्ता व संजीवकुमार सिंघल या अधिकाऱ्यांची नावे शर्यतीत आहेत. या तिघांमध्ये सध्या तरी रितेश कुमार यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. याशिवाय, १९९३ च्या तुकडीतील महिला अधिकारी अर्चना त्यागी आणि मुंबईचे विद्यमान विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या नावावर चर्चा सुरू आहे. आज आयुक्त पदाबाबत निर्णय न झाल्यास विशेष पोलीस आयुक्त असलेल्या देवेन भारतींकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला जाऊ शकतो. तसे झाल्यास राज्य सरकारला निर्णयासाठी अवधी मिळू शकतो.