

मुंबई: काळा घोडा परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामात उभारण्यात येणाऱ्या नॉन-व्हेहिक्युलर (पादचारी) झोनचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईकरांना शहरातील पहिला पादचारी झोन भेट म्हणून समर्पित करण्यात येणार असल्याचे आमदार अमित साटम यांनी सांगितले.
आमदार अमीत साटम म्हणाले की, मुंबईतील परिसरात उभारण्यात येणाऱ्या नॉन-व्हेहिक्युलर (पादचारी) झोनचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा मुंबईतील पहिला पादचारी झोन म्हणून ओळखला जाईल.
प्रवेशद्वारांवर बोलार्ड्स बसविण्यात येणार असून शनिवार-रविवारी वाहनांना प्रवेश बंद राहील. या परिसरात कला, हस्तकला आणि संगीताशी संबंधित विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असून पर्यटकांसाठी आकर्षणकेंद्र विकसित केले जात आहे. जगातील अनेक शहरांप्रमाणेच हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ग्लासगोमधील बुकॅनन स्ट्रीट आणि लंडनमधील कार्नबी स्ट्रीट यांचा आदर्श घेऊन बीएमसीने काळा घोडा परिसरातील रस्ते पादचारी मार्ग म्हणून विकसित करण्याची योजना आखली आहे. यामुळे परिसर अधिक सुरक्षित आणि पर्यटकांचे आकर्षण बनेल.
या प्रकल्पाअंतर्गत काळा घोडा परिसरातील व्ही. बी. गांधी मार्ग (फोर्ब्स स्ट्रीट), रोपवॉक लेन, साईबाबा रोड, रदरफिल्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा रोड या अंतर्गत रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यांवर शनिवारी आणि रविवारी पादचारी मार्ग (पेडेस्ट्रियन झोन) असेल. या प्रकल्पातील विशेष आकर्षण म्हणजे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या कलाकारांनी तयार केलेली चार सुंदर शिल्पे आहेत.
यामुळे परिसराच्या कलात्मकतेत भर पडली आहे. लवकरच येथे ‘अल फ्रेस्को’ डायनिंगची सुविधा सुरू होईल. त्यामुळे पर्यटकांना खुल्या वातावरणात जेवणाचा आनंद घेता येणार आहे. दगडी फरसबंदी असलेले पादचारी मार्ग यांसारखी नागरी कामे पूर्ण झाली आहेत. सांस्कृतिक आकर्षण वाढवण्यासाठी रंगीत भित्तीचित्रे आणि कलात्मक स्थापत्य बसवण्यात आली आहेत.