

मुंबई : मुंबईतील मानखुर्द भागात रिक्षात बसलेल्या एका ११ वर्षांच्या मुलावर पिटबुल कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा कुत्रा मुद्दामहून त्या मुलावर सोडल्याचा आरोप आहे. गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी कुत्र्याचा मालक मोहम्मद सुहैल हसन (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७ जुलै रोजी, पीडित मुलगा आपल्या मित्रांसोबत मानखुर्द परिसरात एका ऑटोरिक्षात खेळत होता. त्यावेळी पिटबुल कुत्र्याला पाहून ते सर्वजण उत्साहाने 'पिटबुल! पिटबुल!' असे ओरडू लागले. हे पाहून कुत्र्याचा मालक, सोहेल खान, पिटबुलला घेऊन रिक्षात शिरला. त्यामुळे सर्व मुले घाबरून पळून गेली. मात्र, पीडित मुलगा वेळेवर निसटू शकला नाही. यानंतर जे घडले ते अत्यंत धक्कादायक होते. सोहेलने आधी मुलाला कुत्र्याची भीती दाखवली आणि नंतर त्याला त्याच्या अंगावर सोडले. स्वतःला वाचवण्यासाठी मुलाने रिक्षातून उडी मारली आणि पळू लागला, पण पिटबुलने त्याचा पाठलाग करून त्याला अनेक ठिकाणी चावा घेतला. पीडित मुलाने सांगितले की, इतर लोक या घटनेचा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त असल्याने कोणीही त्याच्या मदतीला पुढे आले नाही. तो म्हणाला की, कुत्रा त्याचे कपडे पकडून त्याचा पाठलाग करत होता आणि चावा घेत होता, ज्यामुळे तो खूप घाबरला होता.
व्हायरल व्हिडिओमध्ये हा मुलगा एका ऑटोरिक्षामध्ये बसलेला दिसतो आणि त्याच्या शेजारी पिटबुल कुत्रा आहे. कुत्र्याचा मालक मोहम्मद सुहैल हसन ऑटोच्या पुढील सीटवर बसलेला आहे आणि तो मुलाच्या मदतीसाठीच्या आरोळ्यांवर हसताना दिसतो. व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, कुत्रा अचानक मुलावर झडप घालतो आणि त्याच्या हनुवटीवर चावा घेतो. मुलगा कसाबसा रिक्षामधून बाहेर पळतो, तरी कुत्रा त्याच्या कपड्यांना पकडतो. पण मालक त्यावेळी काहीच न करता केवळ हसत असतो.
ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी कुत्र्याच्या मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका युजरने लिहिले, “त्या मुलासाठी ही किती मानसिक धक्का देणारी घटना असेल, असे विकृत लोक कठोर शिक्षा मिळायला हवी, जेणेकरून कोणीही पुन्हा अशी कृती करण्याची हिंमत करणार नाही. पोलिसांनी कारवाई करा आणि त्या मुलाची मानसिक अवस्था तपासा.” एका युजरने लिहिले, “इथे प्राणी नाही, तर माणूसच खरा दोषी आहे.” दुसऱ्याने म्हटले, “ज्याप्रमाणे त्याने मुलावर कुत्रा सोडला, तशीच शिक्षा त्यालाही द्यायला हवी.”
PTIने दिलेल्या माहितीनुसार, जखमी मुलाची ओळख पटली असून, त्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शुक्रवारी FIR दाखल केला आहे. FIR मध्ये नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने मुद्दामहून मुलावर कुत्रा सोडला, जेव्हा तो एका पार्क केलेल्या रिक्षामध्ये खेळत होता. आरोपी मोहम्मद हसन याला नोटीस बजावण्यात आली आहे.