

मुंबई: मुंबईतील पदपथ अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणांपासून मुक्त करून सर्वसामान्यांना सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्त आश्विनी भिडे यांनी 'पादचारी प्रथम' अर्थात 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' ही विशेष मोहिम सुरू केली आहे.
या मोहिमेंतर्गत कुर्ला एल विभागातील प्रशासनाने अंधेरी - घाटकोपर लिंक रोडवरील पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणे, पादचाऱ्यांना होणाऱ्या अडथळ्यांवर कारवाई केली. यामुळे एल वाॅर्डातील पदपथ मोकळे झाले असून पादचारी यांना दिलासा मिळाला आहे.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार आणि परिमंडळ - ५ मधील उपायुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल विभागातील सहाय्यक आयुक्त अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली एल वाॅर्डातील प्रशासनाने सोमवारी धडक मोहिम हाती घेतली होती.
या कारवाईत पदपथावर असलेले अनधिकृ ४ स्टाॅल, दुकाने, गॅरेज आणि शोरूमने बांधलेली ८ रॅम्प तसेच ४ पान टपऱ्यांवर जेसीबी फिरवला.
सदर कारवाई सहाय्यक अभियंता (परिरक्षण), अनुज्ञापन विभाग, अतिक्रमण विभाग, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि इमारत व कारखाने विभागीतील कर्मचारी अधिकारी आदींनी संयुक्तपणे केली. यासाठी १ जेसीबी, ४ डंम्पर, २ चोर गाडी आणि २० ते २५ कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.