

मुंबई ःबिबट्यांच्या नसबंदीची परवानगी केंद्राकडून मिळाली आहे. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजनेत नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करावी,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बिबट्यांंसदर्भात झालेल्या बैठकीत दिले.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेश कुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद-सिंगल, राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.
बिबट्यांचा समावेश शेड्यूल एकमध्ये असल्याने नरभक्षक बिबट्यांना पकडणे, त्यांना मारणे यावर मर्यादा येतात. त्यामुळे बिबट्यांना शेड्यूल एकमधून काढण्यासंबंधी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. पिंजरे, वाहने, मनुष्यबळ आदी बिबटे पकडण्यासाठी आवश्यक साहित्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
बचाव केंद्रांची क्षमता वाढवा ः एकनाथ शिंदे
बिबट्यांची समस्या वाढल्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला असून, तातडीने उपाययोजना करण्यासाठी गाव व शहराजवळ फिरणाऱ्या बिबट्यांना ड्रोनच्या साहाय्याने शोधून त्यांना पकडण्यात यावे. नागरी वस्तीत बिबटे आल्यास नरभक्षक समजूनच त्यांना पकडण्यात यावे अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
शाळांची वेळ बदला ः अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी पोलिस व वन विभागाने गस्त वाढवावी. तसेच, बिबट्यांचा वावर असलेल्या पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील भागांमध्ये शाळांची वेळ सकाळी 9.30 ते दुपारी 4 अशी करण्यात यावी. बिबट्यांना जंगलात भक्ष्य मिळावे, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी केली.