

Mumbai Officer Residence Problem
मुंबई : मुंबईचे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असलेल्या मुंबईत साजेसे घर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे ते आजही ठाण्यातील मानपाडा, निळकंठ वुड येथील बंगला क्रमांक १६ मध्ये राहत आहेत. यासाठी मुंबई महापालिका महिना तीन लाख रुपयांपेक्षा जास्त भाडे मोजणार आहे.
शर्मा यांची मुंबई महापालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांना ठाणे येथील हे निवासस्थान देण्यात आले होते. आता हाच बंगला मुंबई महानगरपालिकने भाडेतत्वावर घेऊन, आपणास वितरित करावा अशी विनंती शर्मा यांनी केली होती. हा अर्ज करताना शर्मा यांनी मुंबई शहरात आपल्या पदाला साजेसे असे निवासस्थान सध्या स्थितीत उपलब्ध नसल्याचेही नमूद केले होते. त्यानुसार महापालिकेने ठाण्यातीलच बंगला शर्मासाठी उपलब्ध करून दिला आहे.
महाराष्ट्र विकास महामंडळात कार्यरत असताना डॉ. शर्मा यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली. परंतु त्यांनी ठाणे येथील बंगला रिकामा न केल्यामुळे ३१ ऑगस्ट २०२४ पासून ३१ मार्च २०२५ या कालावधीतील भाडे मुंबई महापालिकेला द्यावे लागणार आहे. हे भाडे १२ लाख २४ हजार ५२८ रुपये इतकी आहे.
हा बंगला भाडेतत्त्वावर घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १ एप्रिल २०२५ पासून बंगल्याचे मालक नंदिता राजेंद्र मिरानी आणि लिसा राजेंद्र मिरानी यांच्यासोबत करार केला आहे. त्यानुसार घर मालकाला मासिक ३ लाख रुपये भाडे मोजण्यात येणार आहे. त्याशिवाय बंगल्याचा मालमत्ता कर, दूरध्वनी देयके, गॅस जोडणी आकार व देयके, विद्युत देयके, पाणीपुरवठा देयके, सुरक्षा व्यवस्था, दुरुस्तीची कामे, वार्षिक देखभाल याची अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.