

मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पद अस्तित्वात आल्यापासून म्हणजेच गेल्या 94 वर्षांत 35 अमराठी महापौरांनी मुंबई शहराचे नेतृत्व केले आहे; मात्र 1972 ते 2022 या 50 वर्षांत 7 अमराठी महापौर झाले असून हे सर्व अमराठी महापौर काँग्रेसच्या राजवटीमध्ये झाले आहेत.
मुंबईचा महापौर मराठी की अमराठी यावरून सध्या राजकीय वाद-विवाद सुरू आहेत. मुंबईचा महापौर मराठीच असावा, अशी आग्रही भूमिका शिवसेना ठाकरे गटासह मराठी एकीकरण समितीची आहे, तर भाजपाने मुंबईचा महापौर हिंदू असेल असे जाहीर करून, मराठी महापौर होणार की नाही या प्रश्नाला बगल दिली आहे. 1930 पर्यंत महापालिकेच्या प्रमुख पदाला अध्यक्ष असे संबोधले जात होते. मात्र 1931 मध्ये महापालिका सभागृहात एक ठराव करून अध्यक्ष हे पद बदलून महापौर असे करण्यात आले.
मुंबई शहरात पूर्वी मराठी लोकवस्ती सर्वाधिक असताना 1931 मध्ये पहिले जे. बी. बोमन बेहराम हे अमराठी महापौर विराजमान झाले. 1975 पर्यंत 30 अमराठी महापौरांनी मुंबईचे नेतृत्व केले. 1972 नंतर 2022 पर्यंत म्हणजे 50 वर्षांत अवघे सात अमराठी महापौर झाले. यात सर्व अमराठी महापौर हे काँग्रेसचे होते.
1972 पासून 2022 या कालखंडामध्ये आर. के. गणात्रा, बी. के. बोमन बेहराम, एन. डी. मेहता, मुरली देवरा, ए. यू. मेमन, एम. एच. बेदी, आर. आर. सिंह हे सात अमराठी महापौर झाले. हे सर्व काँग्रेसच्या राजवटीमध्ये होते. 1994 ते मुंबई महापालिका विसर्जित होईपर्यंत म्हणजेच 8 मार्च 2022 पर्यंत एकही अमराठी महापौर झालेला नाही.विशेष म्हणजे महापालिकेत 1997 पासून शिवसेना-भाजपची सलग सत्ता असताना एकही अमराठी महापौर झालेला नाही किंवा मराठी-अमराठी महापौर असा वाद झालेला नाही.
शिवसेनेचे सर्व महापौर मराठीच
मुंबई महानगरपालिकेमध्ये 1973 मध्ये शिवसेनेचे सुधीर जोशी हे पहिले मराठी महापौर म्हणून विराजमान झाले. 1997 पासून मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता होती. 2017 मध्ये भाजपा शिवसेनेपासून वेगळा झाला. परंतु या कालखंडात शिवसेनेने महापौरपद मराठी माणसाकडे सोपवले.
भाजपाने अमराठी बसवले उपमहापौरच्या गादीवर
शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेच्या सत्तेत असताना, भाजपाने अनेक अमराठी नगरसेवकांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ घातली. यात गोपाळ शेट्टी, बाबुभाई भवानजी, राजेश शर्मा, विद्या ठाकूर यांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आल्यास अमराठी महापौर झाला तर नवल वाटायला नको.