

मुंबई : कांदिवली व मालाडमधील धोकादायक बनलेल्या सात पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यात 3 वाहतूक पूल असून 4 पादचारी पुलांचा समावेश आहे. त्यामुळे येथील वाहनचालकांसह नागरिकांचा धोकादायक बनलेला प्रवास येत्या दोन वर्षांत सुखकर होणार आहे.
कांदिवली व मालाडमधील वाहतूक पुलांसह पादचारी पूल धोकादायक झाल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या पूल विभागाने येथील पुलांचे स्ट्रक्चरलला ऑडिट केले असता, 7 पूल पूर्णपणे धोकादायक असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटरने हे पूल तोडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याची शिफारस केली. त्यानुसार महापालिकेने नवीन पुलाचा आराखडा तयार करण्यासह कामाचे अंदाजपत्र तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली होती. सल्लागार आणि दिलेल्या सूचनेनुसार आता जुने पूल पाडून नवीन पूल उभारण्यात येणार आहेत.
धोकादायक घोषित करण्यात आलेल्या पुलांमध्ये महालक्ष्मी डेअरी फार्म, हनुमान नगर कांदिवली पूर्व येथील वाहतूक पूलासह हनुमान नगर कांदिवली पूर्व पादचारी पूल गावदेवी रोड कांदिवली पूर्व पादचारी पूल, नरवणे ट्रान्झिट कँप व झोपडपट्टी क्षेत्र यांस जोडणारा कांदिवली (प.) येथील पादचारी पूल, रामनगर चाळ बिहारी टेकडी,
कामराज चाळ कैंपो टोबॅको जवळ, कांदिवली पूर्व येथील पादचारी पूल, सुरभी कॉम्प्लेक्स समोरील पूल साईनगर कांदिवली (प.) येथील वाहतूक पूल व आप्पा पाडा, गांधी टेकडी, मालाड येथील वाहतूक कुलाचा समावेश आहे.
धोकादायक बनलेले जुने पूल तोडून नवीन पूल उभारण्यासाठी 24 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू होणार असून 2027 मध्ये हे पूल वाहन व नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या पुलांसाठी महापालिकेने 19 कोटी 66 लाख रुपये इतका खर्च येईल अपेक्षित धरले होते. मात्र प्रत्यक्षात 11 टक्के जादा दराने निविदा काढण्यात आली. वाटाघाटींनंतर अखेर कंत्राटदाराने सुमारे 20 कोटींमध्ये हे काम करण्याची तयारी दर्शवली आहे.