

मुंबई: उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांतील देवी मंदिरांमध्ये जय्यत तयारी सुरू असून, भाविकांच्या दर्शनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
मुंबादेवी मंदिरासह दक्षिण मुंबईतील काळबादेवी मंदिर, बाबुलनाथ मंदिराजवळील डोंगरावरील दुर्गामाता मंदिर, खेरवाडी रोडवरील दुर्गामाता मंदिर, बोरिवली पूर्वेतील मोठा अंबा माता मंदिर, पश्चिमेकडील अंबा माता धाम आणि कांदिवली पश्चिमेतील चारकोप येथील शक्तिमाता मंदिरात ११ ते २१ ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होत आहे.
मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. मंदिरात पहिल्या दिवशी सकाळी ५.३० वाजता मंगलारतीने दर्शनाला सुरुवात होईल. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात करण्यात येईल.
तसेच सकाळी ९ ते ९.२० या वेळेत पुजारी आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत २५ पुजारी श्री दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यात येणार असून, २० ऑक्टोबरला चंडी हवनाची पूर्णाहुती होईल. मंदिर रात्री १०.३० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. भाविकांना सकाळी ५.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे.
मुंबईतील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरातही जय्यत तयारी सुरू आहे. देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था, सुरक्षितता आणि भाविकांच्या सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिर परिसरात, तसेच हाजी अली चौकापर्यंत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक उपलब्ध असेल, अशी माहिती मंदिर महालक्ष्मी मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.
१०० हून अधिक स्वयंसेवक तैनात
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना रांगेत उभे राहण्यासाठी रस्त्यावर मंडप उभारण्यात आला आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी १०० हून अधिक स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच्या बॅगा आणि साहित्याची तपासणी करण्यासाठी बॅगेज स्कॅनर मशीनचा वापर केला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉक्टरांचे पथक रुग्णवाहिकेसह सज्ज ठेवण्यात येणार आहे.