

मुंबई: मानसिक तणाव, नैराश्य आणि वैयक्तिक समस्यांबाबत मदत मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांकडून ‘टेली-मानस’ हेल्पलाइनचा आधार घेतला जात आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू झालेल्या या २४ तासांच्या मोफत हेल्पलाइनवर पहिल्या वर्षी १० हजार ७८ कॉल्स आले होते.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात ही संख्या एक लाख ४३ हजार ७८७ वर पोहोचली आहे. चार वर्षांत कॉल्सच्या संख्येत जवळपास १४ पट वाढ झाली असून, आतापर्यंत एकूण ३ लाख २ हजार ७७८ कॉल्सची नोंद झाली आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १४४१६ या टोल फ्री क्रमांकावर टेली-मानस सेवा दिली जाते. २०२२-२३ मध्ये १० हजार ७८ कॉल्स आले होते. २०२३-२४ मध्ये ही संख्या ५५ हजार १८१, २०२४-२५ मध्ये ८० हजार १७२, तर २०२५-२६ मध्ये तब्बल एक लाख ४३ हजार ७८७ वर पोहोचली.
२०२६-२७ या आर्थिक वर्षात ३० एप्रिलपर्यंत १३ हजार ५६० कॉल्सची नोंद झाली आहे. मोफत आणि गोपनीय समुपदेशन उपलब्ध असल्याने मानसिक अडचणींबाबत मदत मागण्याचा संकोच कमी होण्यास हातभार लागत आहे. नैराश्य, चिंता, कौटुंबिक व वैयक्तिक समस्या आणि मानसिक तणाव अशा विविध कारणांसाठी नागरिक या हेल्पलाइनशी संपर्क साधत आहेत.
हेल्पलाइननंतर उपचारांचे काय?
कॉल्सची वाढती संख्या मानसिक आरोग्यविषयक मदतीची गरज अधोरेखित करते. मात्र, हेल्पलाइनवर समुपदेशन मिळाल्यानंतर पुढील उपचारांची व्यवस्था किती प्रभावी आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संपर्क साधणाऱ्यांपैकी किती जणांना मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठवले जाते, किती जण प्रत्यक्ष उपचार सुरू करतात आणि किती जण नियमित पाठपुरावा करतात, याची माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे.
मदत मागण्याची तयारी
चार वर्षांत कॉल्समध्ये झालेली जवळपास १४ पट वाढ ही मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत मदत मागण्याची तयारी वाढत असल्याचे दर्शवते. मात्र, हेल्पलाइनशी संपर्क साधणे हा उपचार प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे.
त्यानंतर योग्य तज्ज्ञांकडे संदर्भ, प्रत्यक्ष उपचार आणि नियमित पाठपुरावा यांची साखळी प्रभावी असणे गरजेचे आहे. त्यामुळे टेली-मानसवरील वाढता प्रतिसाद हा केवळ लोकप्रियतेचा आकडा न राहता, राज्यातील मानसिक आरोग्य सेवेची क्षमता तपासण्याची संधी ठरू शकतो.
कॉल्सची संख्या वाढलेली पाहता टेली-मानस उपक्रमाबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून येते. अडचणीच्या वेळी टेली-मानसवर बोलले पाहिजे, हे लोकांना समजू लागले आहे. टेली-मानससाठी काम करणारे मानसशास्त्रज्ञ नागपूर एम्समध्ये प्रशिक्षित असतात. मात्र, मानसिक आजारांची तीव्रता लक्षात घेऊन रुग्णांचे वर्गीकरण करणे आणि त्यानुसार पुढील सूचना व उपचार देणे आवश्यक आहे. या सेवेमुळे किती जणांनी पुढे उपचार सुरू ठेवले, हे सांगणे कठीण आहे.
- डॉ. सुरेश पाटील, सदस्य, महाराष्ट्र मानसिक आरोग्य महामंडळ