

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गाने जोडले जाणार आहेत. त्यासाठी 35 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका क्रमांक 8 ला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गासाठी 3 हजार 954 कोटींच्या कामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका 8 च्या 35 किलोमीटरच्या जोडणीस मान्यता देण्यात आली.
तसेच, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 66 किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली. या महामार्गामुळे जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.
नाशिक शहर परिक्रमा मार्ग
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. या मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर असून, या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून 50 टक्के भूसंपादन झाल्यास कार्यादेश देण्याचा निर्णय पायाभूत सुविधा समितीने घेतला आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे - कोनसरी - मूळचेरा - हेदरी - सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीलाही समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.