Mumbai Municipal Corporation | प्रभाग रचना सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार
BMC Ward Restructuring
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश निघाल्यानंतर गुरुवारी नगर विकास विभागाने मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजीसह 29 महापालिका तसेच नगरपरिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. 11 जूनपासून प्रभाग रचनेच्या कार्यवाहीला सुरुवात झाली असून त्यासाठी 16 जूनपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करावी लागणार आहे. वेळापत्रकानुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश राज्यातील महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकार्यांना देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोग व राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील महापालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्याबाबत नगरविकास विभागाने दोन दिवसांपूर्वी प्रभाग रचनेसंदर्भात आदेश जारी केल्यानंतर गुरुवारी त्याबाबत नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रभागांची रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंदर्भात एक पत्र महापालिकांचे आयुक्त, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मुख्याधिकार्यांना पाठविण्यात आले आहे.
प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करा
वेळापत्रकानुसार मुंबई आणि अ, ब, क आणि ड वर्ग महापालिका तसेच नगरपंचायत व नगरपरिषदेच्या प्रगणक गटाची मांडणी आणि प्रभाग रचनेची तयारी बुधवार, 11 जूनपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील या कार्यक्रमाला 16 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच मुंबईसह अ, ब, क वर्गाच्या महापालिकांना 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान तर ड वर्गाच्या महापालिका आणि नगरपरिषद व नगरपंचायतींना 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करावी लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक जारी
महापालिकांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक
11 ते 16 जून : प्रगणक गटाची मांडणी
17 ते 18 जून : जनगणनेची माहिती तपासणी
19 ते 23 जून : स्थळ पाहणी करणे
24 ते 30 जून : गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे
1 ते 3 जुलै : नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दींची जागेवर जाऊन तपासणी
4 ते 7 जुलै : प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने सह्या करणे
8 ते 10 जुलै : प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणे
22 ते 31 जुलै : प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती व सूचना मागवणे
1 ते 11 ऑगस्ट : हरकतींवर सुनावणी घेणे
12 ते 18 ऑगस्ट : हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाला पाठवणे
29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर : आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे
नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक
11 ते 16 जून : प्रगणक गटाची मांडणी
17 ते 18 जून : जनगणनेची माहिती तपासणी
19 ते 23 जून : स्थळ पाहणी करणे
24 ते 26 जून : गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे
27 ते 30 जून : नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दींची जागेवर जाऊन तपासणी
1 ते 3 जुलै : प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने सह्या करणे
4 ते 8 जुलै : प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक
आयोगाला पाठवणे
15 ते 21 जुलै : प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती व सूचना मागवणे
22 ते 31 ऑगस्ट : हरकतींवर सुनावणी घेणे
1 ते 7 ऑगस्ट : हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाला पाठवणे
22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर : आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे

