

मुंबई: पालिकेतील सत्ताधारी भाजपा शिवसेनेने निधीचे वाटप करताना स्वतःच्या नगरसेवकांना 2 कोटी व त्यापेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना प्रत्येकी अवघा 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे अर्ध्याअधिक मुंबईकरांची चेष्टा करण्यात आली आहे.
स्थायी समितीने केलेल्या निधी वाटपावरून अर्थसंकल्पीय चर्चासत्रात शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसने आपली नाराजी उघड केली आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेनेची सत्ता असून त्यांनी संपूर्ण मुंबईकरांचा विचार करणे आवश्यक होते.
मात्र केवळ राजकारण म्हणून ज्या प्रभागातून विरोधकांचे नगरसेवक निवडून आले त्या प्रभागाच्या विकासासाठी अवघा 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे निम्म्या मुंबईकरांवर झालेला हा अन्याय असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
प्रत्येक नगरसेवकाला दिलेल्या 25 लाख रुपयांमध्ये त्या प्रभागातील नागरी समस्या कशा सोडवणार, असा प्रश्नही अनेक नगरसेवकांनी महापालिका सभागृहात उपस्थित केला. मुंबईतील 227 प्रभागांमध्ये समान निधीचे वाटप होणे आवश्यक होते.
परंतु सत्ताधाऱ्यांनी स्वतःचा विचार करत, निम्म्या अधिक मुंबईकरांना विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचाही आरोप करण्यात आला. यावर उपमहापौर संजय घाडी यांनी करावे तसे भरावे असे मत व्यक्त केले.
मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाची सत्ता असताना, त्यांनी निधीचे वाटप करताना स्वतःचा फायदा बघितला होता. त्यावेळी त्यांना सरसकट मुंबईकरांच्या विकासाचं काही पडले नव्हते. त्यामुळे आता निधी कमी मिळाला म्हणून ओरड का मारली जात आहे असा प्रश्नही घाडी यांनी केला.
मुंबई शहर व उपनगरांत शिवसेना ठाकरे गटाचे 65 नगरसेवक असून त्यांना 16 कोटी 25 लाख रुपये निधी देण्यात आला आहे. भाजपाच्या काही नगरसेवकांना एका प्रभागासाठी 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावरून भाजपा -शिवसेना सत्ताधारी पक्षाचा मुंबईकरांबद्दल असलेला दुजाभाव दिसून येतो. आम्हाला निवडून दिले नाहीत म्हणून तुमच्या प्रभागात कमी निधी दिला, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.