

मुंबई : राजेश सावंत
मुंबई महानगरपालिकेच्या सचिव विभागात काही अपवाद वगळता १९९३ पासून महिलाराज आले आहे. १९९३ ते १९२५ या ३२ वर्षात पूर्वीच्या चिटणीस व आताच्या सचिव या प्रमुख पदावर ९ महिला अधिकारी तर दोन पुरुष अधिकारी विराजमान झाले. त्यामुळे या सचिव विभागात प्रमुख पदावर बसणाऱ्या पुरुषांची १२० वर्षाची मक्तेदारी मोडीत निघाली आहे.
मुंबई पालिकेच्या आताच्या सचिव विभागात १८७३ मध्ये एच. विनफर्ड बॅरो यांची सचिव विभागाचे प्रमुख म्हणून निवड झाली. १८९९ पर्यंत बॅरो सचिव पदावर होते. म्हणजे तब्बल २६ वर्ष त्यांनी हे पद भूषवले. त्यानंतर एम. एन. वाडिया यांची सचिवपदी नियुक्ती झाली. त्यांनाही नऊ वर्षाचा कालावधी मिळाला. त्यानंतर १९९३ पर्यंत सचिव पदावर १८ पुरुष अधिकारी विराजमान राहिला आहे.
सचिव विभागात पहिल्यांदाच उषा दादरकर यांची १९९३ मध्ये प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर २०१२ पर्यंत या पदावर महिला विराजमान झाल्या. यात मृदुल जोशी या सर्वाधिक काळ म्हणजे ८ सचिव पदावर राहिल्या. सुधा खिरे यांनाही ७ वर्षाचा कालावधी मिळाला. २०१२ ते २०२० या आठ वर्षांत सचिव विभागाची जबाबदारी पुरुषांवर होती. २०२० पासून आतापर्यंत या विभागाची जबाबदारी महिलांवरच आहे.
१८७३ पासूनचा रेकॉर्ड उपलब्ध
मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासूनचे महत्त्वाचे दस्तावेज आजही महानगरपालिकेच्या सचिव विभागाने जपून ठेवले आहेत. यामध्ये १८७३ मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्या सभेच्या इतिवृत्तापासून अनेक महत्त्वाच्या दस्तावेजांचा समावेश आहे. सचिव कार्यालयातील जुन्या कपाटांमध्ये हा अमूल्य ठेवा गेल्या दीडशे वर्षांपासून जपून ठेवण्यात आला आहे.
१५० वर्षीय मोहोर यंत्र आजही कार्यरत
य इतिवृत्त व अन्य कागदपत्रांवर एक मोहोर उमटली जाते. गेल्या दीडशे वर्षांपासून ही मोहोर ज्या सील यंत्राद्वारे उमटवली जाते, ते यंत्र सन १८७४ मध्ये लंडन येथे तयार केले आहे. हे यंत्र पूर्णपणे लोखंडी बनावटीचे असून, त्याद्वारे महत्त्वाच्या कागदपत्रांवर मोहोर उमटविली जाते. विशेष बाब म्हणजे जोपर्यंत ही मोहोर उमटत नाही, तोपर्यंत या कागदांना काहीच अर्थ नसतो.