

मुंबई : विधानसभा निवडणुकांतील विजयानंतर विश्वास दुणावलेल्या भाजपने आगामी मुंबई महापालिकेतील विजयासाठी कंबर कसली आहे. पालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने मुंबई भाजपाच्या कोअर कमिटीची आढावा बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. यात पालिकेत महायुतीचा महापौर बनविण्यासाठीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली.
या निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की महायुतीत, याचा निर्णय पक्षनेतृत्व घेईल. मात्र, आगामी महापौर महायुतीचाच असेल आणि महायुती म्हणून १५० हून अधिक जागा जिंकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, लवकरच मुंबई भाजपच्या अध्यक्ष पदी नव्या नावाची घोषणा करण्यात येणार असून त्यासाठी काही नावांची चाचपणी या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई भाजप कार्यालयात आयोजित बैठकीस मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्याशिवाय इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार अमित साटम म्हणाले की, आजच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. येत्या काळात मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि एक हैं तो सेफ हैं हे पोहोचवण्यासाठी आणि महायुतीचा महापौर बनविण्यासाठी रणनीती आखली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणुकांची तयारी करण्याचे प्रत्येक पक्षाला स्वातंत्र्य आहे. आपल्या हातातून निसटलेले मुंबई शहर परत मिळवण्याचे प्रयत्न ते करत असल्याचा टोला त्यांनी यावेळी अप्रत्यक्षरीत्या उद्धव ठाकरे यांना लगावला. आगामी निवडणुकीत महायुतीला दीडशेपक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करतानाच येत्या काळात मुंबईत महायुतीचा महापौर जनता निवडून देईल, असा विश्वास यानिमित्ताने आमदार भातखळकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, भाजपने अलीकडेच सदस्यता अभियानाची घोषणा केली आहे. त्यानुसार मुंबई भाजपकडून १ ते १५ जानेवारी या काळात सदस्यता अभियान राबविण्यात येणार आहे. त्याशिवाय ५ जानेवारीला संपूर्ण मुंबईत बूथ उभारून मुंबईकरांना भाजपचे सदस्यत्व होण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहितीही भातखळकर यांनी दिली.
आशिष शेलार यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने मुंबई भाजपच्या नव्या अध्यक्षाचा शोध सुरु झाला आहे. एक नेता, एक पद या धोरणानुसार शेलार यांच्या जागी नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठी चेहऱ्यालाच संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यात प्रामुख्याने आमदार अमित साटम, पराग आळवणी, अतुल भातखळकर यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. मात्र अध्यक्षाची निवड पक्षनेतृत्वाकडूनच केली जाणार आहे.