मुंबई : तब्बल 4 वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या महापौरपदी रितू तावडे विराजमान झाल्या. त्यांच्या निवडीनंतर आज महापालिका सभागृहात पहिली महासभा पार पडणार आहे. या सभेत सभागृह नेता, विरोधी पक्षनेता यांच्याबरोबरच स्थायी समितीसह वैधानिक समित्यांवर कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होणार आहे.
दुपारी 2.30 वाजता पालिकेच्या सभागृहात ही सभा सुरु होणार आहे. महापालिकेचे नवनियुक्त महापौर समिती अध्यक्षांच्या नावांची घोषणा केल्यानंतर काही प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
आज होणाऱ्या विशेष सभेत विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता यांच्या नावांची अधिकृत घोषणा होणार आहे. भाजपाने महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविल्याने गटनेते गणेश खणकर हे सभागृह नेते होतील, तर शिवसेना (ठाकरे) पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विरोधी पक्ष ठरल्याने गटनेत्या किशोरी पेडणेकर या विरोधी पक्षनेत्या होतील. त्याची अधिकृत घोषणाही आज होईल.
आजच्या सभेत स्थायी आणि शिक्षण या दोन वैधानिक समित्यांवर कोणत्या सदस्यांची वर्णी लागणार ते समजणार आहे. 20 फेब्रुवारीला स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. तर, सुधार आणि बेस्ट समित्यांच्या अध्यक्षपदासाठीची निवड 23 फेब्रुवारीला होणार आहे. 25 तारखेला इतर विशेष समित्यांच्या अध्यक्षांची निवड होणार आहे.