

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘उबाठा’ आणि मनसे या दोन पक्षांनी मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यानुसार आगामी पाच वर्षांत मुंबईकरांना परवडणाऱ्या किमतीत एक लाख घरे देणार, घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये स्वाभिमान निधी, 700 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील सर्वात मोठे ग्रंथालय उभारले जाईल, अशा घोषणा ठाकरे सेनेचे नेते आदित्य आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी केल्या.
शिवसेना (ठाकरे), मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचा शुक्रवारी शिवसेना भवनात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला तिन्ही पक्षांचे सर्व उमेदवार उपस्थित होते. युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी मुंबईतील विकासकामांबाबत नवे संकल्प मांडणारे डिजिटल सादरीकरण केले.
मुंबईकरांसाठी मांडलेले प्रमख मुद्दे
- कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त 10 रुपयांत नाश्ता आणि जेवण देणारे ‘माँसाहेब किचन’, लहान मुलांसाठी दर्जेदार पाळणाघरे, दर दोन किलोमीटरवर महिलांसाठी स्वच्छतागृहे, बेस्टची वीज वापरणाऱ्यांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत, बेस्ट बसेसचे दर पूर्वीसारखे ठेवणार, पाण्याचे दर स्थिर ठेवणार, मुंबईतील प्रत्येक वॉर्डात छोटे क्रीडा संकुल, अत्याधुनिक व्यायामशाळा आणि जुन्या व्यायामशाळांची दुरुस्ती करण्याचे उद्दिष्ट, महापालिकांच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज सुरू करून मराठी भाषा अनिवार्य करणार, मुंबईकरांसाठी मोकळे फुटपाथ, हवेची शुद्धता राखण्यासाठी कृती आराखडा, पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क आणि ॲम्ब्युलन्स, नव्या इमारतीमध्ये प्रत्येक घरासाठी एक पार्किंग देणार, तरुणांना 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार साहाय्यता निधी , बीपीटीची 1,800 एकर जमीन ताब्यात घेणार.