

Mumbai Mulund Metro Slab Collapse LBS Road
मुंबई : मुंबईतील मुलुंड येथे निर्माणाधीन मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. यात 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
मुलुंडमधील लालबहादूर शास्त्री मार्गावर जॉन्सन अँड जॉन्सनसमोरील रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळला. हा स्लॅब रिक्षेवर कोसळला असून बाजूने जाणाऱ्या कारचेही नुकसान झाले आहे. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर 3 जण जखमी झाले आहेत.
मुलुंडमधील खासगी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार पैकी एकाचा रुग्णालयात आणेपर्यंत मृत्यू झाला होता. रामधन यादव असे मृताचे नाव आहे. तर राजकुमार यादव (वय 45), महेंद्रप्रताप यादव (वय 52), दीपा रुहिया (वय 40) अशी जखमींची नावे आहेत. यातील राजकुमार यादव यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलुंडमधील दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना.
उच्चस्तरीय समिती स्थापन
मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) ने मुलुंडमधील दुर्घटनेप्रकरपणी उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. एमएमआरडीएचे संचालक (मेट्रो पीआययू) बसवराज एम. भद्रगोंड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे.