

मुंबई: सायबर फसवणुकीसाठी 'म्युल अकाउंट' उघडून फसवणुकीची रक्कम विविध खात्यांमधून फिरवणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या मध्य विभाग सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून या आरोपींनी दुसर्यांच्या नावावर उघडलेल्या बँक खात्यांचा वापर देशभरातील ८४ हून अधिक सायबर गुन्ह्यांमध्ये झाल्याचे समोर आले आहे.
या रॅकेटमागील इतर सूत्रधारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (सायबर गुन्हे) बजरंग बनसोडे यांनी शनिवारी दिली. ते म्हणाले, मध्य विभाग सायबर पोलिसांना २९ जुलै रोजी गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानुसार सलमान पठाण आणि त्याचे साथीदार इंडियन ओव्हरसीज बँकेच्या बोरिवली शाखेत सायबर फसवणुकीतून जमा झालेली रक्कम काढण्यासाठी येणार असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून सलमान पठाण आणि त्याच्या दोन साथीदारांना १० लाख रुपये काढल्यानंतर, आणि आणखी १० लाख रुपये काढण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले. त्यानंतर भाईंदर आणि मिरा रोड येथील कार्यालयांवर छापे टाकून आणखी चार जणांना अटक करण्यात आली.
या आरोपींमध्ये सलमान हबीब पठाण (३४), साजिद निशारअहमद कोठावाला (४६), चिराग केतन टेपराणी (३१), सय्यद वजाहत वाहीउद्दीन (४१), राकेश रमाशंकर मिश्रा (४२), रक्षित के. राजेंद्र हेगडे (३५) आणि आयर्न रितेश ठाकूर (१८) यांचा समावेश आहे.
झडतीदरम्यान पोलिसांनी १० लाख रुपये रोख, १६ मोबाईल फोन, ३१ कंपन्यांचे शिक्के, २३ सिमकार्ड, २२ चेकबुक, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या विविध कंपन्यांच्या नावावरील खाते उघडण्याचे संच, कॅश काउंटिंग मशीन तसेच आधार, पॅन आणि बँक खात्यांशी संबंधित मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त केली.
जप्त बँक खात्यांची राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर पडताळणी केली असता, या खात्यांचा वापर भारतातील विविध राज्यांमध्ये नोंद असलेल्या ८४ पेक्षा अधिक सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त (सायबर गुन्हे) सुवर्णा शिंदे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या सायबर पोलीस पथकाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
"एका व्यक्तीचे केवायसी, दुसऱ्याचा पत्ता आणि तिसऱ्याची सही वापरून 'म्युल अकाउंट' उघडण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. खातेदारांचा गुन्ह्याशी संबंध नसल्यास त्यांना सोडण्यात येईल. मात्र, टोळीशी संबंध किंवा सहभाग आढळल्यास संबंधित खातेदारावरही कारवाई केली जाईल. मुंबईत कार्यालय थाटून ही टोळी काम करत होती. या रॅकेटमधील अन्य सदस्यांचा शोध सुरू आहे."
- बजरंग बनसोडे, पोलीस उपायुक्त (सायबर)