

मुंबई : चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनोरेल आजपासून काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढणार आहे. या भागात पुरेशा प्रमाणात बेस्टसेवा उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे.
वडाळा ते चेंबूर हा पहिला टप्पा फेब्रुवारी २०१४ रोजी सेवेत आला होता तर पुढील टप्पा मार्च २०१९ पासून सुरू करण्यात आला. एकूण २० किमीच्या या मार्गिकेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने गेली अनेक वर्षे ही मार्गिका तोट्यात आहे.
मंगेश राणे हे मोनोरेलचे नियमित प्रवासी आहेत. ते अँटॉप हिल ते व्ही. एन. पुरव मार्ग या मार्गावर नियमित प्रवास करत असत. हा ४५ मिनिटांचा प्रवास ते केवळ ४० रुपयांत करत. आता त्यांना अँटॉप हिलवरून शेअर टॅक्सीने जीटीबीनगर किंवा वडाळा रेल्वे स्थानक गाठावे लागेल. यासाठी १० रुपये खर्च येईल. पुढे चेंबूर स्थानकापर्यंत ५ रुपये तिकीट. चेंबूरपासून कार्यालयापर्यंत १५-२० मिनिटे चालत जावे लागेल. त्याऐवजी रिक्षा केल्यास ३० रुपये खर्च येईल. असा एकेरी प्रवासाचा खर्च ४५ रुपये होईल. येताना पुन्हा तेवढेच पैसे व वेळ खर्च करावा लागेल.
वाशीवरून येणारे प्रवासी वडाळ्याला उतरून मोनोरेल पकडत व पुढे संत गाडगे महाराज चौक येथे उतरून सात रस्त्याला जात. मात्र गाड्यांची संख्या कमी असल्याने फार कमी फेऱ्या चालवल्या जात. परिणामी, बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर मोनोगाडी खच्च भरून जात असे. अतिवजनामुळे गाड्या बंद पडत. यामुळे मोनोरेलला प्रवासी संख्या वाढवता आली नाही. शेकडो कोटींचा तोटा दरवर्षी सोसावा लागला. लोअर परळ, करी रोड, चेंबूर या ३ स्थानकांपासून मोनोरेल स्थानके जवळ आहेत. मात्र इतर मोनो स्थानकांतून बाहेर पडल्यावर रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्याने ही सेवा गैरसोयीची ठरत आहे.