

मुंबई : रविवारी संध्याकाळी कांदिवली पश्चिम मेट्रो स्थानकावर संध्याकाळी एक मेट्रो बराच वेळ थांबल्याने संपूर्ण मेट्रो मार्गिकेवरील सेवा विस्कळीत झाली. काही मेट्रो स्थानकांमध्ये अर्धा ते पाऊण तास मेट्रो थांबल्याची तक्रार प्रवासी करत होते.
अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2 अ मार्गिकेवरील कांदिवली पश्चिम मेट्रो स्थानकात संध्याकाळी एका मेट्रोमध्ये तांत्रिक अडचण आल्याने मेट्रोगाडी स्थानकात बराच वेळ थांबली. त्यामुळे मागून येणाऱ्या मेट्रोगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मेट्रो 2 अ व मेट्रो 7 ही संयुक्त मार्गिका असल्याने दोन्ही मार्गिकांवर म्हणजेच अंधेरी पश्चिम ते गुंदवली या संपूर्ण मार्गिकेवर तांत्रिक बिघाडाचा परिणाम झाला.
गुंदवलीकडे जाणारी मेट्रो आनंदनगर स्थानकात 45 मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबली होती. अंधेरी पश्चिम स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 45 मिनिटे मेट्रोची वाट पाहावी लागली. त्यानंतर आलेली मेट्रोगाडी 30 मिनिटे स्थानकात थांबली होती. पुढे प्रत्येक स्थानकात ही मेट्रो 10 मिनिटे थांबत होती. त्यामुळे वेगवान प्रवासासाठी मेट्रोचा पर्याय निवडलेल्या प्रवाशांना कासवगतीचा अनुभव आला. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक अडचण दूर करून रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे मेट्रोसेवा चालवण्यात आली.