

मुलुंड: मुंबई मेट्रो लाईन-४ (वडाळा-ठाणे) अंतर्गत शांग्रीला मेट्रो स्टेशनच्या बांधकाम कामासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी भांडुपमधील लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) रोडवर रात्रीच्या वेळी वाहतुकीत मोठा बदल केला आहे.
पूर्व उपनगर विभागाचे पोलीस उपआयुक्त (वाहतूक) प्रदीप चव्हाण यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भांडुप पोलीस ठाण्याजवळील डॉ. कल्पना चावला चौक आणि भांडुप पश्चिममधील सोनापूर जंक्शन दरम्यानचा रस्ता ६ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत किंवा गर्डर बांधकामाचे काम पूर्ण होईपर्यंत दोन्ही दिशांनी वाहतुकीसाठी बंद राहील.
हे निर्बंध दररोज रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत लागू राहतील. आपत्कालीन वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.
पर्यायी मार्गाने असे जा पुढे...
कांजूरमार्ग आणि भांडुपकडून मुलुंड आणि ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला भांडुप व्हिलेज रोड, बाळकृष्ण तातोजीराव शिंदे चौक आणि सुभाष नगर रोडमार्गे वळवण्यात येईल, त्यानंतर ही वाहने सोनापूर जंक्शन आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला (जीएमएलआर) जोडली जातील. हलक्या वाहनांना मारुती मंदिर रोड, लेक रोड, स्वतंत्र सैनिक नाथा बाबाजी थोरात रोड आणि श्री कायकाई शेट्टी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
सोनापूर जंक्शन आणि मुलुंडहून कांजूरमार्ग आणि भांडुपच्या दिशेने जाणारी वाहतूक सुभाष नगर रोड, बाळकृष्ण तातोजीराव शिंदे चौक आणि भांडुप व्हिलेज रोडमार्गे डॉ. कल्पना चावला चौकात वळवण्यात येणार आहेत तर हलकी वाहने श्री कायकाई शेट्टी मार्ग, स्वतंत्र सैनिक नाथ बाबाजी थोरात रोड आणि लेक रोडमार्गे जातील.
गांधीनगर जंक्शनकडून सोनापूर जंक्शनकडे जाणारी वाहने जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर), ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ऐरोली फ्लायओव्हर आणि जीएमएलआरचा वापर करू शकतात व विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक उलट्या मार्गाने जातील.