

Mumbai Metro Green Initiative
मुंबई : इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीचे चार्जिंग संपल्यास मेट्रो स्थानक किंवा मोनोरेल स्थानकावर थांबून ही बॅटरी बदलता येणार आहे. या ठिकाणी वाहनचालकांना पूर्ण चार्ज असलेली बॅटरी मिळेल. त्यामुळे पुढील प्रवास विनाअडथळा पार पाडता येणार आहे. या उपक्रमामुळे एमएमएमओसीएलला तिकिटाव्यतिरिक्त सुमारे 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
मेट्रो आणि मोनोरेल स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी भागीदारी केली आहे. या उपक्रमांतर्गत 25 मेट्रो स्थानके व 6 मोनोरेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे अॅडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसवण्यात येईल.
इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत पर्यावरणस्नेही ऊर्जा उपाययोजना आणि स्मार्ट लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमएमओसीएलच्या 29व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे धोरण मंजूर करण्यात आले. या प्रणालीद्वारे इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे वापरकर्ते त्यांच्या चार्ज संपलेल्या होंडा मोबाइल पॉवर पॅक ई बॅटरीऐवजी दुसरी पूर्ण चार्ज केलेली बॅटरी केवळ दोन मिनिटांत घेऊ शकतात.
यामुळे चार्जिंगसाठी लागणारा वेळ, रेंजमध्ये येणारे अडथळे या समस्या वाहनचालकांना जाणवणार नाहीत.
मेट्रो, मोनोरेल स्थानकांवर बॅटरी स्वॅपिंगची जलद सुविधा देत आम्ही भविष्यसज्ज वाहतूक व्यवस्थेचा पाया घालत आहोत. पहिले ई-स्वॅप केंद्र दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावर कार्यान्वित झाले आहे. मुंबईत आणखी 30 ठिकाणी ही सुविधा वेगाने सुरू केली जात आहे.
डॉ. संजय मुखर्जी, एमएमआरडीएचे आयुक्त आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष
1. मेट्रो 7 मार्गिका (लाल मार्गिका) : गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, देवी पाडा, राष्ट्रीय उद्यान
2. मेट्रो 2 अ मार्गिका (पिवळी मार्गिका) : दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, एक्सर, बोरिवली पश्चिम, शिंपोली, कांदिवली पश्चिम, डहाणूकरवाडी, मालाड पश्चिम, लोअर मालाड, बांगूर नगर, ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी पश्चिम
3. मोनोरेल स्थानके : संत गाडगे महाराज चौक, मिंट कॉलनी, नायगाव, वडाळा, फर्टिलायझर टाऊनशिप, चेंबूर